पालिका निवडणूक कर्तव्यावर मृत पावणार्‍यांच्या कुटुंबास १० लाखांची मदत!

पालिका निवडणूक कर्तव्यावर मृत पावणार्‍यांच्या कुटुंबास १० लाखांची मदत!

मुंबई महानगरपालिका मुख्यालय

निवडणुकीच्या कामांच्या तणावामुळे कर्मचार्‍यांचा मृत्यू होणार्‍या कर्मचार्‍यांच्या वारसांना आर्थिक सहाय्य म्हणून सानुग्रह अनुदान देण्याचे धोरण मुंबई महानगर पालिकेने बनवले आहे. यामध्ये मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या कामांमध्ये कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्‍याच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना दहा लाख रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. तर दहशतवादी हल्ल्यात कर्मचारी मृत पावल्यास त्यांच्या वारसांना वीस लाख रुपये तर कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास पाच लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. याबाबतच्या धोरणाच्या मसुद्याचा प्रस्ताव महापालिकेच्या विधी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

कुणाला मिळणार आर्थिक मदत?

निवडणूक कर्तव्यार्थ असताना मृत पावलेल्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या वारसांना गंभीर जखमी अथवा कायमचे अपंगत्व आलेल्या कर्मचार्‍यांना सानुग्रह अनुदान देण्याची तरतूद शासनाच्या ग्रामविकास खात्याने ९ एप्रिल २०१४ रोजी केली आहे. त्याच धर्तीवर राज्य निवडणूक आयोगाने आदेश देऊन महापालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कर्तव्यार्थ हजर असलेल्या अधिकारी, कर्मचार्‍यांचा निवडणुकीच्या कामावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना अथवा जखमी झालेल्या कर्मचार्‍यास अनुदान देण्याची शिफारस केली होती.


हेही वाचा – कारवाई आहे कुठे? पालिकेच्या फलकांशेजारीच वाहनांची पार्किंग!

किती आर्थिक मदतीचा प्रस्ताव?

निवडणुकीच्या कर्तव्यार्थ असताना मृत पावलेले अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वारसांना १० लाख रुपये, निवडणुकीच्यावेळी दशहतवादी हल्ला, बॉम्ब हल्ला, सुरुंग अथवा शस्त्राचा हल्ला झाल्यास मृतांच्या नातेवाईकांना २० लाख रुपये आणि कायमस्वरुपी अपंगत्व आलेल्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना जसे की हात, पाय, डोळा गमावल्यास ५ लाख रुपये एवढे अनुदान देण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले असून त्याचे पालन मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे.

First Published on: July 15, 2019 10:15 PM
Exit mobile version