राहुल गांधींवरही बनतोय सिनेमा

राहुल गांधींवरही बनतोय सिनेमा

my name is ra ga movies poster

निवडणुकीच्या तोंडावर ‘बायोपीक’चे जोरदार पीक उगवत आहे. ‘दिअ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’, ‘ठाकरे’, ‘पीएम नरेंद्र मोदी’, या चित्रपटांतून देशातील राजकीय नेत्यांचे चरित्र प्रेक्षकांसमोर येत असतानाच या ‘बायोपीक’मध्ये आणखी एका नेत्याच्या ‘बायोपीक’ची भर पडली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ‘माय नेम इज रागा’ या आगामी चित्रपटाचे टिझर आले असून राहुल यांना रुपेरी पडद्यावर झळकवून काँग्रेस मतदारांना आकर्षित करण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे.

राजकीय पटलावर एकमेकांच्या विरोधात उभे राहणारे राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील चढाओढ त्यांच्या ‘बायोपीक’मधून लोकांच्या समोर येणार आहे. आपली प्रतिमा प्रभावीपणे जनतेच्या समोर आणण्यासाठी चित्रपट हे उत्तम माध्यम आहे. त्यामुळेच की काय निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकामागोमाग एक राजकीय नेत्यांचे ‘बायोपीक’ बनवले जात आहेत. २०१९ हे वर्ष अनेक कारणांसाठी महत्त्वाचे ठरेल. कारण याच वर्षात लोकसभेच्या महाराष्ट्रासह चार राज्यात निवडणुका आाहेत.

राजकीय नेत्यांच्या ‘बायोपीक’चे पीक

विशेष म्हणजे या वर्षात लोकसभा आणि महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र या वर्षाची सुरुवातच पॉलिटिकल वॉरने झाली आहे. हा वॉर केवळ राजकीय आखाड्यात नव्हे तर कलाकृतींच्या माध्यमातूनही जनतेसमोर आला आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जीवनपट ११ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या ‘दिअ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या बायोपिकमधून प्रेक्षकांसमोर आला. तर २५ जानेवारीला शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘ठाकरे’ सिनेमा रिलीज झाला. कसलेला अभिनेता म्हणून ओळख असलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकीने बाळासाहेब साकारलेला ‘ठाकरे’ सिनेमा हिंदी आणि मराठी अशा भाषांमध्ये बनवण्यात आला. शिवाय ‘ठाकरे’ चित्रपटाचा दुसरा भागही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

काही दिवसांपूर्वी ‘पीएम नरेंद्र मोदी’ या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. चित्रपटाचे दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केले असून अभिनेता विवेक ओबेरॉय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तसेच अभिनेता परेश रावलदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट २३ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. एकीकडे या ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला आता कुठे सुरुवात झाली असून दुसरीकडे त्यांचे प्रमुख विरोधक काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या बायोपिकचा टीझरदेखील आला आहे. अवघ्या ४.३ सेकंदाच्या या टीझरमधून राहुलच्या बालपणापासून ते राष्ट्रीय अध्यक्षापर्यंतची झलक पहायला मिळत आहे. चित्रपटाची सुरुवात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येच्या दृश्यापासून होते तर त्याचा शेवट २०१९च्या लोकसभा निवडणुकांच्या तापलेल्या वातावरणात होते.

रूपेश पॉल या पत्रकाराने चित्रपटाची पटकथा लिहिली असून यामध्ये राहुल गांधींचे बालपण, अमेरिकेतील विद्यार्थी जीवन आणि राजकीय वादविवादांचे चित्रण केले आहे. अभिनेता अश्विनी कुमार यांनी राहुल गांधींची व्यक्तिरेखा साकारली आहे. मात्र हा सिनेमा केव्हा प्रदर्शित होईल हे स्पष्ट झालेले नाही.

First Published on: February 10, 2019 6:20 AM
Exit mobile version