कागदी लगद्याने साकारली ‘तेजूकायाची २२ फुटांची मूर्ती’

कागदी लगद्याने साकारली ‘तेजूकायाची २२ फुटांची मूर्ती’
गणेशोत्सव  म्हटलं की प्रत्येकाला लालबागच्या राजाच्या मूर्तीची आठवण होते. पण, यंदाचं खास आकर्षण ठरणार आहे तो म्हणजे तेजूकाया सार्वजनिक मंडळाचा बाप्पा. कारण, यावर्षी मंडळाने कागदाच्या लगद्यापासून तब्बल २२ फुटांची मूर्ती साकारली आहे. तेजुकाया मंडळाने गणेशमुर्ती शासनाच्या पर्यावरणपूरक या विषयाला अनुसरून घडवली आहे. कागद, शाडू माती आणि डिंक यांचे मिश्रण करून दीड टन वजनाची २२ फुटी मुर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचा जागर करण्यासाठी ही मुर्ती साकारण्यात येत आहे. प्रत्येकाने पर्यावरणाशी जोडले जावे, पर्यावरणाचा र्‍हास टाळावा हा यामागचा मुख्य हेतू असल्याचे मंडळाचे अध्यक्ष सुशांत शिंदे यांनी सांगितले.

इकोफ्रेंडली बाप्पासाठी रहिवाशांचाही पुढाकार 

मे महिन्याच्या सुरूवातीपासून गणेशमुर्ती साकारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. यासाठी स्थानिक रहिवाशांनाही आपल्या घरातील रद्दी मंडळाकडे सुपूर्द करण्याचे आवाहन करण्यात आलं होतं. त्यानुसार, इथल्या रहिवाशांनी तेजूकायाचा राजा इकोफ्रेंडली असावा या हेतूने मंडळाला मदत केली.

वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये नोंद

यंदा सर्वात मोठी पर्यावरण पुरक मुर्ती असल्याने येत्या ४ सप्टेंबरला वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये या कागदी गणेश मूर्तीची नोंद केली जाणार असल्याचेही तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सुशांत शिंदे यांनी सांगितले आहे.

अशी साकारली मूर्ती 

ही मूर्ती बनविण्यासाठी तब्बल ५ महिन्यांचा कालावधी लागला आहे.  मूर्ती बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. गणेशाची मुर्ती कागदाचा लगदा, शाडूची माती, डिंक यांचे मिश्रण तीन ते चार दिवस कुजवले जाते. तसंच,  मिश्रणादरम्यान व्हाईटिंग पावडर आणि शाडूची मातीचे मिश्रण तयार केले जाते. कागद कुजल्यामुळे घट्टपणा येतो. कागदी लगद्यापासून बनवण्यात आलेली गणेशमुर्ती समुद्रात विसर्जन केल्यावर पाऊण तासाच विरघळणार असल्याची माहिती मुर्तिकार राजन झाड तसंच त्यांचे भाऊ मुर्तिकार अजित खोत यांनी दिली आहे.

पुरग्रस्तांना मदत

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापूर येऊन मोठे नुकसान झाले. तर,  पुरग्रस्तांना मदत स्वरूपात २ ते ३ लाखांचे साहित्य पुरवण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने ५ ते ६ शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात येणार आहे. तसंच, अनंत चतुर्थीपर्यंत अनेक कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, भाविकांनी येताना फुले आणि फुलांच्या माळा आणण्याऐवजी पेन वही आणण्याचे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.
First Published on: August 28, 2019 10:05 AM
Exit mobile version