घरमुंबईमूर्ती विक्रेता विरुध्द गणेश मूर्तीकार

मूर्ती विक्रेता विरुध्द गणेश मूर्तीकार

Subscribe

श्री गणेश मूर्तिकला समितीची स्थापना

मूर्तीकार असल्याचे भासवून पदपथावर मंंडप उभारुन रेडीमेड गणेश मूर्तींची विक्री करणार्‍या तोतया मूर्तिकारांच्या विरोधात अस्सल मूर्तिकार एकवटले आहेत. गणेश मूर्तिकारांनी यासाठी ‘श्री गणेश मूर्तिकला समिती’ स्थापन केली असून या समितीच्या माध्यमातून मूर्तिकला जोपासणार्‍या मूर्तिकारालाच महापालिकेने गणेशमूर्ती बनवण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी समितीने केली आहे. यासाठी ही समिती आता मूर्तिकारांचीच परीक्षा घेणार आहे. यामध्ये पास होणार्‍यांचीच मूर्तिकार म्हणून निवड करून त्यांनाच महापालिकेच्यावतीने परवानगी मिळवून मंडप उभारण्यास परवानगी दिली जावी,अशी सूचना या समितीने केली आहे.

मुंबईतील अस्सल श्री गणेश मूर्तिकारांच्या व्यवसायात मूर्ती घडवण्यासाठी आवश्यक असलेली जागा व त्यासाठी उभारण्यात येणारे मंडप आदी समस्यांबाबत श्री गणेश मूर्तिकला समितीच्यावतीने सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी समितीचे संस्थापक अध्यक्ष वसंत राजे आणि सचिव डॉ. सुमित पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत महापालिकेने २४ विभाग कार्यालयांमध्ये प्रत्येकी एकाच मूर्तिकाराला परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. हाडाच्या मूर्तिकारांना न्याय देण्यासाठी आणि तोतया मूर्तिकारांना रोखण्यासाठी या समितीची स्थापना केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

मुंबईसह उपनगरांमध्ये सार्वजनिक पदपथावर महापालिकेची परवानगी घेवून गणेशोत्सवाच्या पूर्वी गणेश मूर्ती विक्री करता जे मंडप उभे राहतात त्यातील किमान ७० टक्के मंडपधारक हे गणेश मूर्तिकार नसतात. ते स्वयंघोषित तोतया मूर्तिकार आणि गणेशमूर्तींचे बाजारीकरण करणारे व्यावसायिक आहेत. या घुसखारांमुळे विनाकारण सार्वजनिक पदपथ अडवले जातात आणि खर्‍या मूर्तिकाराला त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित राहावे लागते, अशी खंत राजे यांनी व्यक्त केली. मात्र, यापुढे पदपथांवर गणेशमूर्तींच्या विक्रीसाठी महापालिकेने मंडप उभारण्यास परवानगी देऊ नये,असेही त्यांनी स्पष्ट केले.

गणपतीच्या मूर्ती तयार करण्यासाठी तात्पुरते मंडप बांधण्याबाबत देण्यात येणार्‍या परवानगीसाठी महापालिकेच्या कार्यालयात अर्ज करणारा अर्जदार हा जुना असो वा नवीन असो, त्याला गणेश मूर्तिकलेची चाचणी परीक्षा घेवून सादर करण्यात आलेल्या प्रमाणपत्राच्या आधारेच सार्वजनिक अथवा खासगी जागेवर मंडप बांधण्याची परवानगी देण्यात यावी,असेही त्यांनी स्पष्ट केले. जर ही परीक्षा घेण्यास महापालिकेकडे मनुष्यबळ नसेल तर याची जबाबदारी समिती आपल्या खांद्यावर घेईल. त्यामुळे समिती मातीकाम करणे, शेडींग करणे, आखणी व लिखाई करणे आदी तीन प्रकारात ही परीक्षा घेईल,असेही राजे यांनी सांगितले. गणेश मूर्तिकलाकाराला ही परवानगी मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात देण्यात यावी आणि याची मुदत घटस्थापनेपर्यंत असावी,अशी मागणी समितीने केली आहे.

- Advertisement -

मुंबईत सध्या दोन हजारांहून गणेश मूर्तिकार आहेत. यासर्व गणेश मूर्तिकारांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ही चळवळ उभारण्यात आली असून सध्या या समितीत काही ठराविक मूर्तिकार असले तरी भविष्यात ही चळवळ व्यापक होवून सर्वच मूर्तिकार या समितीच्या छताखाली एकत्र येतील,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -