शाळेतील रेन वॉटर हार्वेस्टिंग बनले कचरापेटी

शाळेतील रेन वॉटर हार्वेस्टिंग बनले कचरापेटी

पावसाळ्यात वाहून जाणार्‍या पाण्याचा पुनर्वापर व्हावा यासाठी मुंबईतील 120 पालिका शाळांमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प सुरू करण्यात आले होते. यावर्षी मुंबईत जोरादार पाऊस झाला असताना त्याचा चांगला वापर झाला असता, परंतु ऐन पावसाळ्यातच अनेक शाळेतील प्रकल्पांना कचरापेटीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. मुंबईतील बहुतांश शाळांमधील रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प अनेक महिन्यांपासून बंद असून, ते धुळ खात पडले आहेत. त्यामुळे पाणी जमिनीत झिरपवण्याच्या व त्याचा पुनर्वापर करण्याच्या उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे.

मुंबईतील पाण्याच्या पातळीत वाढ व्हावी आणि पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर व्हावा या उद्देशाने मुंबई महापालिकेने 120 शाळांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारले होते. 2007 नंतर पुनर्बांधणी केलेल्या तसेच प्रमुख दुरुस्ती केलेल्या शाळांमध्ये हे प्रकल्प उभारले आहेत. रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पासाठी पालिकेने 2 लाखांची तरतूद केली आहे. मात्र अनेक दिवसांपासून पालिकेने शाळांच्या आवारात उभारलेले हे रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प धूळ खात पडले आहेत. दहिसरमधील महापालिकेच्या भरूचा रोड महापालिका शाळा संकुल, सखाराम तरे मार्ग मनपा शाळा संकुल, कांदिवली महापालिका माध्यमिक शाळा या शाळांसह मुंबईतील अनेक शाळांमध्ये उभारण्यात आलेले प्रकल्प अनेक दिवसांपासून बंद आहेत.

प्रकल्प उभारलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असल्याने या प्रकल्पांना एक प्रकारे कचरापेटीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पात साचलेल्या कचर्‍यामुळे हे प्रकल्प ऐन पावसाळ्यात बंद पडले आहेत. सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणात होत असलेल्या पावसाचे पाणी साठवण्यास हे प्रकल्प सहाय्यभूत ठरले असते. परंतु पालिकेच्या दुर्लक्षामुळे हे प्रकल्प निकामी ठरले आहेत. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून उभारलेले रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाच्या मूळ उद्देशालाचा हरताळ फासला गेला आहे.

रेन वॉटर हार्वेस्टिंगसारखा महत्त्वाचा प्रकल्प धूळ खात पडणे हे पालिकेच्या शिक्षण विभागाच्या दृष्टीने भूषणावह नाही. हा प्रकल्प असलेल्या शाळांचे तातडीने लेखा परीक्षण करण्याचे निर्देश शाळा पायाभूत सुविधा शाखेला द्यावेत. तसेच दोषींवर योग्य ती कारवाई करावी
– साईनाथ दुर्गे, सदस्य, शिक्षण समिती

शाळांमध्ये सुरू केलेले रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प सुस्थितीत आहेत. काही प्रकल्पांमध्ये थोडाफार कचरा पडला आहे. तो कचरा आमच्या एजन्सीला काढण्यास सांगितले आहे. त्यामुळे कचर्‍यामुळे बंद झाले असतील तर ते लवकरच सुरू होतील.
– अतुल कुलकर्णी, उप मुख्य अभियंता, महापालिका

First Published on: September 19, 2019 5:53 AM
Exit mobile version