रायगड, रत्नागिरीत पावसाचा रेड अलर्ट

रायगड, रत्नागिरीत पावसाचा रेड अलर्ट

Weather In Maharashtra : राज्यात पुढील तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून या दोन्ही जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. यामुळे या ठिकाणी जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे चिपळूणमध्ये गेली १७ तास मुसळधार पाऊस कोसळत असून पुन्हा एकदा महापुराची भीती असल्याने आधीच एनडीआरएफही पथक दाखल झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर एनडीआरएफचे पथक मंगळवारी चिपळूणमध्ये दाखल झाले. २५ जवानांसह आवश्यक ती यंत्रणा घेऊन हे पथक पुणेमार्गे चिपळूणमध्ये दाखल झाले आहे.

२२ जुलैला चिपळूणमध्ये महापूर आला त्यावेळी हजारो नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. त्यांना वाचवण्यासाठी एनडीआरएफला पाचारण करण्यात आले खरे. परंतु पुणेमार्गे येताना सातारा कोयना येथे या टीमला अडथळ्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे तब्बल १४ तास उशिरा चिपळूणमध्ये दाखल झाली. तत्पूर्वी स्थानिक पातळीवर बचावकार्य सुरू झाले होते. त्यामुळे एनडीआरएफच्या टीमला फारसे काम राहिले नव्हते. एनडीआरएफची टीम उशिरा दाखल झाल्यामुळे नागरिकांकडून प्रशासनावर टीकाही झाली होती.

रत्नागिरी जिल्ह्यात ९ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. चिपळूणमध्ये गेली १७ तास मुसळधार पाऊस कोसळत आहे. शहराच्या सखल भागात पाणी भरत असून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पाण्याचा निचरा होत आहे. परंतु प्रशासनाने 22 जुलैच्या महापुराचा धडा घेत पूर परिस्थिती हाताळण्यासाठी नियोजन केले आहे. शहरात विभागवार नोडल अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाणी भरण्यास सुरुवात झाल्यानंतर भोंगा वाजवून सतर्कतेचा इशाराही दिला जात आहे.

First Published on: September 8, 2021 3:06 AM
Exit mobile version