मराठा आरक्षणाला स्थगिती देण्‍यास नकार

मराठा आरक्षणाला  स्थगिती देण्‍यास नकार

मराठा आरक्षण

सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाबाबत झालेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास बुधवारी नकार दिला आहे. कोर्टाच्या पुढील आदेशापर्यंत मराठा आरक्षण लागूच राहील, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात नोकर्‍या आणि शिक्षणात मराठा आरक्षण कायम राहणार आहे. मराठा आरक्षणाच्या निर्णयावर स्थगिती देण्याचा अंतरिम आदेश देता येणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने बुधवारी सुनावणीदरम्यान स्पष्ट केले. या प्रकरणावरील पुढील सुनावणी आता १७ मार्चला सुरू होणार आहे.

यापूर्वी देखील सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. जुलै २०१९ मध्ये सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात देण्यात आलेल्या आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. त्यावेळी तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने मुंबई हायकोर्टाने दिलेल्या आरक्षणावर पूर्वलक्ष्यी प्रभावाबाबतचा निर्णय देखील स्थगित केला होता.

मराठा आरक्षण रद्द करावे म्हणून सुप्रीम कोर्टात याचिका करत दाद मागण्यात आली आहे. इंदिरा साहनी प्रकरणी घटनापीठाने निश्चित केलेल्या आरक्षणावर ५० टक्क्यांच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्याचे या याचिकेत म्हटले आहे. राज्य सरकारने शिक्षण आणि शासकीय नोकर्‍यांमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारच्या या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. मात्र, मुंबई हायकोर्टाने या संबंधातील याचिका फेटाळून लावली. या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर बुधवारी सुनावणी घेताना सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिला.

First Published on: February 6, 2020 5:45 AM
Exit mobile version