जातीचा कॉलम काढून टाका

जातीचा कॉलम काढून टाका

दिग्दर्शक-हेमंत भालेकर

दिग्दर्शक-हेमंत भालेकर…

गेली अनेक वर्षे मी मतदान करत आहे. प्रत्येक पक्ष विभागासाठी, राज्यासाठी, देशासाठी काय करणार हे प्रथम लोकांपर्यंत पोहोचवत होते आणि नंतर मतदानाचा आग्रह करत होते. पण यंदाची लोकसभा निवडणूक लक्षात घेतली तर कोणत्याही पक्षाने आपला ठोस अजेंडा मांडलेला नाही. एकमेकांचे दोष दाखवणे हाच उद्देश प्रचारामध्ये अधिक दिसतो. प्रथम देशातील जातीयता नष्ट झाली पाहिजे. त्याची सुरवात जन्माच्या दाखल्यापासून झाली पाहिजे.

जात कोणती हे सांगणारा कॉलम नष्ट झाला तर भविष्यात त्या व्यक्तीला आपण भारतीय आहोत हे सांगताना अभिमान वाटेल. मतदाराने जागृत राहून मतदान करावे. नकारच द्यायचा असेल तर तोही मतदानातून व्यक्त करा. पहिल्या निवडणुकीत काही कोटींची संपत्ती असणारा उमेदवार जेव्हा दुसर्‍या निवडणुकीत हीच संपत्ती दुप्पट झाल्याचे जाहीर करतो, अशा उमेदवाराला सरकारनेच जाब विचारायला हवा. मुंबईत अनेक इमारतींचा पुर्नविकास होत आहे. त्यासाठी दहा वर्षांहून अधिक काळ रहिवाशांना वेठीस धरले जाते.

पाणी येणार, वीज दिली जाणार असे आश्वासन दिले जाते. पण प्रत्यक्षात काम होत नाही. अशा गोष्टींवर सरकारचा फक्त कटाक्ष नको, तर आश्वासन देणार्‍याला शिक्षा झाली पाहिजे. प्रत्येक कामासाठी लाच द्यावी लागते. त्यासाठी आयुष्यभर कमवावे लागते. उतरत्या वयात जगण्याची आशा संपते त्यावरही विचार व्हायला हवा.

First Published on: April 5, 2019 4:41 AM
Exit mobile version