डोंबिवलीतील ‘ती’ धोकादायक इमारत पाडण्यासाठी रहिवाशांचा पुढाकार

डोंबिवलीतील ‘ती’ धोकादायक इमारत पाडण्यासाठी रहिवाशांचा पुढाकार

डोंबिवलीतील शंकर पार्वती इमारत

एमआयडीसी परिसरातील निवासी विभागातील शंकर पार्वती सोसायटी या धोकादायक इमारतीत राहणाऱ्या १६ कुटूंबियांनी सकाळी स्वत:हून घर खाली करून तोडण्यास सुरूवात केली. त्यामुळे एमआयडीसीने इमारत तोडण्याचा कार्यक्रम रद्द केला. मात्र केडीएमसीने ताफा घेऊन इमारत तोडण्याची कारवाई केल्याने रहिवाशांनी त्याला विरोध दर्शवत पालिकेची तोडण्याची कारवाई थांबविली. रहिवाशांनी नातेवाईकांकडे तर अनेकांनी दुसरीकडे भाड्याने खोली घेवून सामान हलविले आहे. काही दिवसांवर शाळा सुरू होणार असल्याने अनेकांची तारांबळ उडाली आहे. या जागेवर नव्याने इमारत बांधून लवकरात लवकर घरे मिळावी, अशी अपेक्षा रहिवाशांनी व्यक्त केली.

रहिवाश्यांच्या विरोधामुळे कारवाई थांबली

‘शंकर पार्वती’ सोसायटी ही इमारत धोकादायक झाल्याने एमआयडीसीने रहिवाशांना स्वत:हून घर खाली करण्याची व इमारत तोडण्याची नोटीस बजावली हेाती. एमआयडीसीने आज सोमवारी इमारत तोडण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र तत्पूर्वीच रहिवाशांनी स्वत:हून घरे खाली करून इमारत तोडण्याची कारवाई केली. त्यामुळे एमआयडीसीने इमारत तोडण्याचा कार्यक्रम रद्द केला. मात्र केडीएमसीचा कोणताही संबंध नसताना महापालिकेचे ई प्रभाग क्षेत्र अधिकारी, हे ताफा घेऊन इमारत तोडण्याची कारवाई करू लागल्याने स्थानिक रहिवाशांनी त्यांना विरोध दर्शविला. अखेर पालिकेला कारवाई थांबवावी लागली.

एमआयडीसीला रहिवाशांचे पत्र

सदर इमारत तोडण्याचे काम एमआयडीसी करणार होती, तशी त्यांनी नोटीस बजावली होती. त्यात इमारतीचा खर्च रहिवाशांकडून वसूल करण्यात येणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे रहिवाशांनी एमआयडीसीला पत्र पाठवून इमारत आम्हीच तोडतो असे सांगितले होते. मात्र अचानक पालिकेचे पथक आले. त्यामुळे त्यांना तोडण्यास विरोध करण्यात आला, असे रहिवाशांनी सांगितले.

First Published on: June 10, 2019 6:53 PM
Exit mobile version