रुस्तमजी दुपर्स शाळा फी वाढीत दोषी

रुस्तमजी दुपर्स शाळा फी वाढीत दोषी

दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची फी राज्य सरकार भरणार!

मुंबई : मुंबईसह राज्यातील शाळांमध्ये फी वाढीचा मुद्दा गाजत असताना यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच दहिसर येथील रुस्तमजी ट्रुपर्स शाळेच्या फी वाढीचा मुद्दा वादात अडकला होता. याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेने केलेल्या चौकशीअंती या शाळेने फी वाढ केल्याचे समोर आले असून शिक्षणाधिकार्‍यांनी केलेल्या चौकशीअंती ही बाब आता समोर आली आहे. त्यामुळे आता शाळेच्या अडचणीत वाढ झाली असून येत्या काळात शाळेवर कोणती कारवाई केली जाते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दहिसर येथील रुस्तमजी टपर्स शाळेने भरमसाट फी वाढ केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी पालकांकडून करण्यात आली होती. यावेळी पालकांनी केलेल्या तक्रारीनुसार युवा सेनेतेर्फे पालिका शिक्षणाधिकारी महेश पालकर यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारींची दखल घेत युवासेनेने केलेल्या मागणीनुसार शाळेची चौकशी केली असता शाळेने भरमसाट फीवाढ केल्याचे उघड झाले आहे. शाळेने इयत्ता पहिलीच्या फीमध्ये पालक शिक्षक संघटनेच्या संमतीने दहा टक्के वाढ केली आहे. ही वाढ पहिलीपासून लागू होणे अपेक्षित होते, मात्र शाळेने सीनियर केजीच्या फीमध्येही दहा टक्के वाढ केली आहे. तसेच दुसरी ते पाचवीसाठी जी फीवाढ केली आहे ती आधीच्या इयत्तेच्या फीवर केली आहे. हे पूर्णतः नियमबाह्य असल्याचा आरोप युवासेना कार्यकारिणी सदस्य तसेच पालिका शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे यांनी केला आहे.

या फीवाढीप्रकरणी पालिका शिक्षण विभागाच्या शाळा अधीक्षक व विभाग निरीक्षकांनी रुस्तमजी शाळेची चौकशी करून पालिका शिक्षणाधिकाऱयांकडे अहवाल सादर केला असून या अहवालात फीवाढीसंदर्भात गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी अधिक माहितीसाठी शाळेच्या संस्थाचालकांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. अवाजवी फीवाढ करून रुस्तमजी शाळेने पालकांची फसवणूक केली आहे. पालक-शिक्षक संघाच्या बैठकीत मोघम माहिती देऊन फीवाढ मान्य करून घ्यायची व प्रत्यक्षात अवाच्या सवा फीवाढ करायची असे प्रकार अनेक शाळांमध्ये सुरू आहेत. पण शिक्षण विभाग या शाळांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप युवासेनेने केला असून फीवाढ सोसणार्‍या पालकांना न्याय मिळवून देण्यासाठी युवासेना पालकांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे दुर्गे यांनी स्पष्ट केले.

First Published on: September 21, 2018 2:49 AM
Exit mobile version