माध्यमिक विद्यालयाचा सुवर्णमहोत्सव साजरा

माध्यमिक विद्यालयाचा सुवर्णमहोत्सव साजरा

सुवर्णमहोत्सव

माध्यमिक विद्यालयाचा सुवर्णमहोत्सव सोहळा म्हणजे या शाळेच्या सर्व शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांवर केलेल्या संस्काराची परतफेड होय. आपापल्या क्षेत्रात उंच भरारी मारताना हे विद्यार्थी शाळेला विसरले नाहीत आणि त्यांची शाळा, त्यांचे शिक्षक आजही त्यांच्या मनात घर करून आहेत, असे उद्गार सुप्रसिद्ध अभिनेते आणि सिध्दीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी काढले. विक्रोळी, कन्नमवार नगर येथील माध्यमिक विद्यालय शाळेचा सुवर्णमहोत्सव नुकताच घाटकोपर येथील झवेरबेन हॉलमध्ये संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन माध्यमिक विद्यालय माजी विद्यार्थी समूहाने केले होते. या कार्यक्रमाला निर्माते, दिग्दर्शक मंदार देवस्थळी व आपलं महानगरचे कार्यकारी संपादक संजय परब यांची विशेष अतिथी होती. याप्रसंगी शाळेचे १९७२ पासून ते २०१९ पर्यंतचे विद्यार्थी उपस्थित होते. त्याचप्रमाणे सर्व आजीमाजी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोठी गर्दी केली होती. माध्यमिकचे सर्व माजी विद्यार्थी हे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहेत.

कामगार वस्तीमधील माध्यमिक शाळेच्या मुलांनी विपरीत परिस्थितीशी दोन हात करत शिक्षण घेतले आणि हे शिक्षण घेताना त्यांच्यावर शिक्षकांचे मोठे संस्कार झाले. यामुळेच हि मुले ज्या कुठल्या आपल्या आवडीच्या क्षेत्रात गेली तिथे त्यांनी आपल्या नावाची छाप पाडली, असे विचार संजय परब यांनी मांडले. माजी विद्यार्थ्यांनी माध्यमिक विद्यालयाची जडणघडण दाखवणारी एक स्मरणिका तयार केली. त्याचे प्रकाशन आदेश बांदेकर यांच्या हस्ते झाले. तसेच माजी शिक्षकांच्या मुलाखतीची एक चित्रफीत बनवून तो या कार्यक्रमादरम्यान दाखवला गेला.

First Published on: August 22, 2019 6:06 AM
Exit mobile version