शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतराला शिवसेनेचा विरोध

शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतराला शिवसेनेचा विरोध

मीरा-भाईंदर शहराची शान असलेला काशीमिरा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थलांतरित करण्याचा घाट काही लोक घालत आहेत. मात्र कोणत्याही परिस्थितीत हा प्रयत्न शिवसेना यशस्वी होऊ देणार नाही. काशीमिरा नाका येथील महाराजांचा पुतळा तेथेच राहिला पाहिजे. इतरत्र पुतळा आम्ही हलवू देणार नाही. उलट काशीमिरा नाका येथील या पुतळ्याची उंची वाढवून त्याचे सुशोभीकरण करावे, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडली.

मीरा-भाईंदर महापालिकेचे नवे आयुक्त चंद्रकांत डांगे यांची आमदार सरनाईक यांनी शिवसेनेच्या सर्व नगरसेवक, पदाधिकारी अशा शिष्टमंडळासह सदिच्छा भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. पालिकेत नवीन आयुक्त आल्याने त्यांना शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले तसेच मीरा-भाईंदर शहरातील विकासकामांवर चर्चा करण्यात आली. यावेळी सगळ्यात आधी महाराजांच्या पुतळ्याच्या विषयावर सरनाईक यांनी सविस्तर भूमिका मांडली.

मीरा-भाईंदर शहराची ओळख आणि शान असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा काशिमीरा येथील अश्वारूढ पुतळा मीरा-भाईंदर मेट्रोच्या कामामुळे घोडबंदर येथे हलवण्यात येण्याचा विचार सुरु असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून शहरात सुरू आहे. पालिकेतील सत्ताधारी पक्ष या हालचाली करत असल्याचे बोलले जातेय. मात्र महाराजांचा काशीमिरा येथील पुतळा कुठल्याही परिस्थितीत तेथून स्थलांतरित करण्याचा विचार कुणीही करू नये,असा इशाराही सरनाईक यांनी दिला आहे.

First Published on: February 20, 2020 2:08 AM
Exit mobile version