विमानतळाच्या नावात महाराज हवेचं; शिवसैनिक आक्रमक

विमानतळाच्या नावात महाराज हवेचं; शिवसैनिक आक्रमक

मुंबई विमानतळाच्या नावात बदलावरुन शिवसैनिक आक्रमक

मुंबई विमानतळावर शिवेसेनेचे आंदोलन सुरु आहे. शिवसेनेचे गटनेते अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन सुरु आहे. मुंबई विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करावे या मागणीसाठी शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. विमानतळाच्या आतमध्ये घुसून शिवसैनिकांनी आंदोलन केले. त्यानंतर जीव्हीके कंपनीला नाव बदलासाठी इशारा दिला.

जीव्हीके कंपनीच्या बाहेर आंदोलन

जीव्हीके कंपनीच्या चुकीमुळे छत्रपती शिवाजी आंतराष्ट्रीय विमानतळ असे नाव घेतले जात आहे. हे नाव बदलून विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करावे. ही दुरुस्ती त्वरित करावी यासाठी अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी जीव्हीके कंपनीच्या कार्यालयात जाऊन आंदोलन केले.

जीव्हीके कंपनीला दिला इशारा

विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आतमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बसवावा. बाहेर हायवेवर उभारलेल्या महाराजाच्या पुतळ्याशेजारी योग्य सुशोभीकरण करावे. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांची कमी असलेली उंची त्वरीत वाढवावी या मागण्या करत अनिल परब यांनी जीव्हीके कंपनीला इशारा दिला आहे. गेली अनेक वर्षे पत्र व्यवहार करूनही काहीच केले जात नसल्याने शिवसैनिकांनी हे आंदोलन केले आहे.

शिवेसेना आणि जीव्हीके कंपनीमध्ये झाली बैठक

जीव्हीके कंपनीच्या बैठकीमध्ये झाले निर्णय

आंदोलनानंतर शिवसैनिक आणि जिव्हीके कंपनीमध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाच्या नावाच्या प्रक्रियेचे काम संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल, असे जीव्हीके कंपनीने सांगितले असल्याचे अनिल परब यांनी सांगितले. शिवाजी महाराजा पुतळ्याभोवती सुशोभीकरण करण्याबाबत १५ दिवसात डिझाइन जीव्हीके कंपनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवणार. ती डिझाइन फायनल झाल्यावर काम सुरू होईल. शिवजयंतीला उद्धव ठाकरे यांनी केलेली ही मागणी पूर्ण होणार असल्याचे अनिल परब यांनी सांगितले.

मागण्या पूर्ण नाही झाला तर विमानतळ बंद करु

शिवाजी महाराजांचा पुतळा कुठे लावायचा याबाबत लवकरच जीव्हीके कंपनी सांगणार आहे. याबाबत 20 दिवसांचा कालावधी दिला आहे. 20 दिवसात पुतळा कुठे ठेवणार आणि स्वरूप कसे असेल तेही सांगणार आहेत. याठिकाणच्या म्युझिअममध्ये महाराजांची माहिती ठेवायला हवी. 20 दिवसात सांगितलेल्या सर्व मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही विमानतळ बंद करू. आत जायचे सगळं रस्ते आम्हाला माहीत असल्याचे अनिल परब यांनी सांगितले.

First Published on: August 8, 2018 1:44 PM
Exit mobile version