वसई नाताळसाठी सज्ज

वसई नाताळसाठी सज्ज

नाताळ अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपला असताना वसईत नाताळची जोरदार तयारी सुरु झाली आहे. बाजारपेठा सजल्या आहेत. तर घराघरात नाताळनिमित्ताने फराळ बनवण्यात महिला गुंतल्या आहे. नाताळ निमित्ताने येशू ख्रिस्त जन्म देखावे (गोठे) उभारणी सुरु आहे. देखाव्यासाठी लागणारे पुतळे बनवण्यासाठी कारागीरांची लगबग सुरू आहे.

अध्यात्म, भक्ती, श्रद्धा, आनंद आणि उत्साह जल्लोष घेऊन येणारा नाताळ सण साजरा करण्यासाठी वसईकर मग्न झाले आहेत. चर्चमध्ये तर डिसेंबरच्या पहिल्या रविवारपासूनच नाताळ सणानिमित्ताने विधी केले जात आहेत. डिसेंबरच्या पहिल्या रविवारी श्रद्धेचे प्रतिक आणि दुसर्‍या रविवारी आशेचे प्रतिक म्हणून जांभळ्या रंगाच्या मेणबत्या सर्वच चर्चमध्ये लावल्या गेल्या. तिसर्‍या रविवारी आनंदाचे प्रतिक म्हणून गुलाबी रंगाची मेणबत्ती लावण्यात आली. तर शेवटच्या चौथ्या रविवारी प्रितीचे प्रतिक असलेली पांढर्‍या रंगाची मेणबत्ती पेटवण्यात येईल.

एकीकडे, चर्चमधून नाताळ सणाच्या आगमनानिमित्ताने दर रविवारी धार्मिक विधी होत असताना वसईत नाताळची लगबग दिसू लागली आहे. घराघरात फराळ बनवण्यात महिला गुंतल्या आहेत. चर्च, घरे, वाड्यांना रंगरंगोटी केली गेली आहे. ठिकठिकाणी नाताळ गोठे बनवण्याच्या कामावर शेवटचा हात फिरवला जात आहे. वसई विरारच्या बाजारपेठांमध्ये गोठे बनवण्यासाठी लागणार्‍या पुतळेही तयार झाले आहेत. बाजारपेठा सज्ज झाल्या असून खरेदीसाठी गर्दी झालेली दिसून येत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजारपेठेत सांताक्लॉजचे लहान-मोठे बाहुले दिसत आहेत. त्याचबरोबर ख्रिसमस ट्री, जिंगल बेल, कंदील, म्युझिकल लाईट, टेबल क्लॉज, ग्रिटींग कार्डस, सिंगिंग अंँट डान्सिंग कॅप, इकोफ्रेंडली कँडल्स अशा नानाविध वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत.

बुधवारपासून येशूच्या जन्माची वार्ता सांगणार्‍या नाताळगीतांचे (कॅरल सिंगिंग) कार्यक्रम विविध सामाजिक संघटना तसेच चर्चसंलग्न संघटनांमधील तरुण गावागावात करू लागले आहेत. अद्ययावत वाद्यांसह नाताळगीते गाऊन गावागावात नाताळ सणाचे वातावरण तयार करण्याचे काम करण्यासोबतच या गीतांमधून सामाजिक संदेशही दिला जातो.

First Published on: December 20, 2019 3:26 AM
Exit mobile version