‘स्मार्ट वॉच’ ठेवणार पालिकेच्या डॉक्टरांवर नजर

‘स्मार्ट वॉच’ ठेवणार पालिकेच्या डॉक्टरांवर नजर

पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनंतर आता डॉक्टरांवरही ‘स्मार्ट’ नजर

कामचुकारपणा, चालढकलपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी पालिकेच्या वतीने ‘स्मार्ट वॉच’ संकल्पना राबविली जात आहे. पहिल्या टप्प्यात सफाई कामगारांना या ‘स्मार्ट वॉच’चे वाटप करण्यात आले असून कामावर हजर झाल्यावर ते घालणे सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र त्यानंतर आता आरोग्य विभागातील सर्व डॉक्टरांना हे ‘स्मार्ट वॉच’ देण्यात आले असून त्यांनाही हे वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे. हे घड्याळ न वापरल्यास वेतनकपात केली जाईल, अशी सूचनाही त्यांना देण्यात आली आहे.

डॉक्टरांवरही ‘स्मार्ट वॉचद्वारे’ नजर

कार्यालयात येऊन हजेरी लावल्यावर कर्मचारी खरेच कामावर हजर असतात की नाही, की बाहेर जातात, याची सर्व माहिती हे घड्याळ पुरविणार आहे. जियो फेसिंग अंतर्गत हे घड्याळ्याचे वाटप करण्यात येत आहे. हे घड्याळ जीपीएस यंत्रणेद्वारे जोडले गेले आहे. ज्याचे नियंत्रण बेलापूर मुख्यालयातून केले जात आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत आतापर्यंत एक हजार कर्मचाऱ्यांना घड्याळांचे वाटप करण्यात आले आहे. यात पहिल्यांदा सफाई कामगारांचा समावेश करण्यात आला होता. मात्र आता थेट डॉक्टरांनाही घड्याळे देण्यात आली आहेत. पालिकेत आऊट सोर्सिंग पद्धतीने काम करणाऱ्याची संख्या साडेपाच हजारांच्या घरात आहे. तर आरोग्य विभाग घनकचरा उद्यान, क्रीडा पाणीपुरवठा, मलनि:सारण मालमत्ता विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या तीन हजारांच्या घरात आहे. या सर्वांना या घड्याळ्यांचे वाटप करण्यात येणार असून डॉक्टरांना याचा वापर करणे बंधनकारक असणार आहे. यानुसार बेलापूर विभागातील कर्मचाऱ्यांना ही घड्याळे देण्यात आली आहेत आणि त्यांना ती वापरण्यासही सांगण्यात आले आहे.

घड्याळे खरेदी करण्यासाठी ११ कोटी ५१ लाख खर्च

वाशीतील पालिका प्रथम संदर्भ रुग्णालय आणि नेरूळमधील माता बाल रुग्णालयामधील डॉक्टरांना या घड्याळांचे वाटप करण्यात आले असून त्यांनाही हे घड्याळ वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे घड्याळ वेळ सांगण्याचे काम तर करतेच, परंतु या घड्याळात जीपीएस सिस्टीम आणि कॅमेरा आहे. त्यामुळे हे घड्याळ एकदा हातावर बांधले की त्याची नोंद मुख्यालयात होते. त्यामुळे ते कामावर असताना काढू शकत नाही. या घड्याळावरून हा कर्मचारी कुठे आहे? कार्यालयात आहे की कार्यालयाबाहेर? याची माहिती मुख्यालयात असलेल्या नियंत्रण कक्षाला मिळणार आहे. शिवाय कुणी किती वेळ काम केले? याचा तपशीलही मिळणार आहे. एखादा कर्मचारी आपले कार्यक्षेत्र सोडून गेल्यास त्याची माहितीही हे घड्याळ पुरवते. या घड्याळातून फोटो काढण्याची सुविधा आहे. त्यातून कर्मचारी कुठल्या ठिकाणी आहे याचा पुरावा देखील मिळणार आहे. या एका घड्याळासाठी ३१५ रुपये इतका खर्च आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांसाठी ही घड्याळे खरेदी करण्यासाठी ११ कोटी ५१ लाख रुपये खर्च पालिका करणार आहे.

सध्या आरोग्य विभागातील डॉक्टरांनाही स्मार्ट वॉच वापरण्यास देण्यात आले आहेत. त्यानुसार सर्व डॉक्टर हे घड्याळ वापरत आहे. स्वःत मीसुद्धा हे घड्याळ वापरत आहे.  – दयानंद कटके, आरोग्य अधिकारी, नवी मुंबई महापालिका


हेही वाचा – डॉक्टर्सना हे प्रश्न विचाराच

हेही वाचा – आरोग्य अहवालावर बोगस डॉक्टरची सही; गुन्हा दाखल


 

First Published on: April 7, 2019 6:19 PM
Exit mobile version