व्यसनी नवरा – बायकोमुळे सोसायटीची झोप उडाली!!

व्यसनी नवरा – बायकोमुळे सोसायटीची झोप उडाली!!

Drinking

व्यसन करण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून तरुण दाम्पत्याने स्वत:ला घरात कोंडून घेत जाळपोळ केली. नेरूळमधील आशीर्वाद सोसायटीमध्ये मंगळवारी ह प्रकार घडला. यावर पोलिसांनी हस्तक्षेप केला असता व्यसनी दाम्पत्याने पोलिसांवर काचा फेकून सिलिंडर स्फोट करण्याची धमकी दिली. यामुळे तब्बल १६ तासांहून अधिक काळ आशीर्वाद सोसायटी या व्यसनी दाम्पत्याच्या दावणीला बांधून ठेवलेली होती. अखेर सायंकाळी चारच्या सुमारास या दाम्पत्याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर सोसायटीसह रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.

विवेक सावंत (३०) असे ताब्यात घेण्यात आलेल्या व्यसनी तरुणाचे नाव आहे. विवेक गेल्या अनेक वर्षांपासून व्यसनाच्या आहारी गेला आहे. विवेकने यापूर्वीही अनेकदा पैशासाठी परिवाराची कोंडी केली आहे. याचदरम्यान त्याने सात ते आठ महिन्यांपूर्वी एका व्यसनी मुलीशी लग्न केले. त्यामुळे परिवाराच्या अडचणीत अधिकच वाढ झाली आहे. त्याचे आई वडील नेरूळ सेक्टर १६ ए मधील आशीर्वाद सोसायटीत राहतात. याठिकाणी विवेक अधूनमधून येतो. सोमवारी आई वडील नसताना विवेक आणि त्याची पत्नी रात्री घरी आले. त्यावेळी त्यांनी घरात असलेल्या त्यांच्या आजोबांना नशा करण्यासाठी पैसे मागितले. त्यावेळी आजोबांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर विवेक व त्याच्या पत्नीने आजोबांशी वाद घालायला सुरुवात केली. यावर बाजूला राहणार्‍या रहिवाशांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता विवेकला त्याचा राग आला. परिणामी विवेकने रात्री १२च्या सुमारास आजोबांना घराच्या बाहेर काढून स्वत: आणि त्याच्या पत्नीला घरात कोंडून घेतले. इतरांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता त्याने घरातील वस्तू त्यांना फेकून मारण्यास सुरुवात केली.

रात्री १२ वाजल्यापासून सुरू झालेला वाद मंगळवारी सकाळीही कायम असल्याने पोलिसांनी याप्रकरणी मध्यस्थी केली. पोलीस त्याच्या घराजवळ गेले असता विवेकने त्यांच्यावर काचा फेकल्या. तसेच, जर घरात आलात तर सिलिंडर स्फोट करेल, अशी धमकी दिली. घरात चार सिलिंडर असल्याने संपूर्ण सोसायटीत खळबळ माजली. आजुबाजूला राहणार्‍या रहिवाशांनी घराबाहेर धाव घेतली. मंगळवारी सकाळी विवेकने घरातील काही वस्तू जाळल्या असता तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने हातात लायटर घेऊन सिलिंडर स्फोट करण्याचा इशारा दिल्याने अखेर पोलीस हतबल झाले. अखेर पोलिसांनी खिडकीच्या जाळ्या तोडून घरात प्रवेश केला. विवेक आणि त्याच्या पत्नीला मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास ताब्यात घेतले. याप्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात विवेक व त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

विवेक हा विकृत असून, त्याला रात्री मारहाण करण्यात आली. त्याचवेळी त्याने रागाच्या भरात स्वत:ला घरात कोंडून घेतले. त्याला आम्ही समजवण्याचा प्रयत्न केला असता त्याने आमच्याच कर्मचार्‍यांच्या अंगावर काचा फेकल्या. त्याच्यामुळे इतरांचे मोठे नुकसान होऊ नये म्हणून शर्तीचे प्रयत्न करत त्याला मंगळवारी सायंकाळी ताब्यात घेण्यात आले.
– राजेंद्र चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नेरूळ पोलीस ठाणे

विवेक हा माझ्या मुलीचा मुलगा आहे. त्याचे वडील मुंबईला एका शाळेत शिक्षक आहेत. आई वडील घरी नसताना तो रात्री घरी आला. त्यानंतर विवेकने सदरचा तमाशा सुरू झाला. सात – आठ महिन्यांपूर्वी त्याने एका व्यसनी मुलीशी लग्न केले आहे. दोघेही व्यसनी असून, त्यांनी स्वत:ला घरात कोंडून घेऊन घराची नासधूस केली. तसेच, रात्री मलाही बाहेर काढले.
– विवेक याचे आजोबा

First Published on: January 23, 2019 5:35 AM
Exit mobile version