उत्पन्न घटल्याने ‘ओला’वर वाईट वेळ

उत्पन्न घटल्याने ‘ओला’वर वाईट वेळ

देशाच्या मेट्रोसिटीमध्ये प्रवासी सेवा देणार्‍या ओलाची अवस्था करोनाच्या संकटाने बिकट केली आहे. गेल्या दोन महिन्यात धंदाच नसल्याने १४०० कर्मचार्‍यांना नोकरीवरुन काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ओलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भावेश अग्रवाल यांनी एक नोटीस जारी करत याबाबतची माहिती दिली. करोनामुळे कंपनीचे उत्पन्न घटल्याने कंपनीला हा निर्णय घ्यावा लागला आहे, असे भावेश अग्रवाल यांनी म्हटले.

गेल्या दोन महिन्यांमध्ये कंपनीच्या महसूलमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. करोनाचा अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला आहे. त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आहे, असे भावेश अग्रवाल यांनी या नोटीसमध्ये म्हटले आहे. भावेश अग्रवाल यांच्या मते, गेल्या दोन महिन्यांमध्ये कंपनीचे उत्पन्न ९५ टक्क्यांनी कमी झाले आहे. त्यामुळे कंपनीवर ही वाईट वेळ आली आहे.

देशात लॉकडाऊनची घोषणा झाल्यापासून ओलाने कॅब सर्व्हिसेस बंद केल्या होत्या. त्यामुळे कॅब व्यवसायावर मोठा परिणाम झाला.

उबरवरही घाला
कोविड-१९ मुळे उबरनेही जगभरातील आपल्या ३००० पेक्षा जास्त कर्मचार्‍यांना नोकरीवरुन काढून टाकण्याची घोषणा केली आहे. करोनामुळे कंपनीपुढे अनेक आर्थिक आव्हाने उभी झाली आहेत. त्यामुळे खर्च कमी करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतल्याचे उबरने सांगितले.

स्विगी, झोमॅटोतही कपात
याशिवाय, फूड डिलीव्हरी करणार्‍या कंपनी स्विगी आणि झोमॅटोनेही कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. स्विगी येत्या काही दिवसात त्यांच्या ११०० कर्मचार्‍यांना नोकरीवरुन काढणार आहे. तर झोमॅटोही त्यांच्या १३ टक्के कर्मचार्‍यांना कामावरुन काढणार आहे.

First Published on: May 22, 2020 4:22 AM
Exit mobile version