आता सीएसएमटी स्थानकाबाहेर पकडा ई-टॅक्सी

आता सीएसएमटी स्थानकाबाहेर पकडा ई-टॅक्सी

ई-टॅक्सी

विमानतळाच्या बाहेर ओला , उबेर टॅक्सींसारख्या अनेक ई-टॅक्सी प्रवासासाठी हजर असतात. त्याच धर्तीवर मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या सीएसएमटी स्थानकाबाहेर ई-टॅक्सी दिसणार आहेत. यासाठी एका कंपनीशी करार करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकातून बाहेर पडताच लगेच ओला, उबेरसारख्या ई- टॅक्सी सेवेचा लाभ घेता येणार आहे.

रेल्वे प्रवाशांना उत्तम सुविधा देण्यासाठी मध्य रेल्वे प्रयत्न करत आहे. वाढते डिजिटल युग लक्षात घेता मध्य रेल्वेने महत्वपूर्ण रेल्वे स्थानकांबाहेर प्रवाशांना निश्चित स्थळी पोहचण्यासाठी ई-टॅक्सीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून होणार आहे. यासाठी मध्य रेल्वेने निविदा सुद्धा काढल्या होत्या. त्यानुसार मध्य रेल्वेने मेरू कॅब या कंपनीशी करार केला आहे.

वर्षाला या कंपनीकडून मध्य रेल्वेला ४ लाख ५० हजार रुपये इतका महसूल मिळणार आहे. यासाठी मध्य रेल्वेने सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेर लवकरच पीक अ‍ॅप पॉईंट उभारणार आहे. त्यामुळे आता प्रवाशांना सीएसएमटी स्थानकाबाहेरुन ई- टॅक्सी मिळणे सोपे होणार आहे. प्रवाशांनी स्मार्टफोन किंवा अ‍ॅपवरून टॅक्सीचे बुकिंग केल्यानंतर टॅक्सी स्टँडजवळ त्यांना तत्काळ टॅक्सी मिळेल. सीएसएमटीचे हे मॉडेल आणखी काही महत्वपूर्ण रेल्वे स्थानकांवर लवकरच राबविण्यात येणार आहे.

स्थानकावर पिक अप झोन

सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकावर ही सुविधा येत्या काळात उपलब्ध होणार आहे. त्यानंतर दादर, ठाणे, एलटीटी आणि पनवेल यांसारख्या प्रमुख रेल्वे स्थानकांवर ई- टॅक्सीसाठी पिक अप झोन तयार करण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकाच्या बाहेर या टॅक्सीसाठी खास पार्किंगची जागा निश्चित करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाचा विचार करत आहे.त्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकातून बाहेर पडतात लगेच ई टॅक्सीसारख्या यापुढे चालणार्‍या टॅक्सी सेवेचा लाभ घेता येईल.

रेल्वे प्रशासनाने विचार करूनच ई- टॅक्सीच्या कंपन्यांना रेल्वे स्थानकांबाहेर जागा द्याव्यात. कारण काळी-पिवळी टॅक्सी चालकांच्या आणि मालकाच्या परिवाराचा उदरनिर्वाह यावर चालतो. कदाचित त्यांच्या व्यवसायावर काही परिणाम झाला तर आम्ही रेल्वेविरोधात आंदोलन करू. – के.के. तिवारी, अध्यक्ष, स्वाभिमानी टॅक्सी रिक्षा चालक- मालक संघटना

First Published on: August 8, 2019 5:26 AM
Exit mobile version