हवेची गुणवत्ता खालावली !

हवेची गुणवत्ता खालावली !

आयक्यूएअर संस्थेकडून सांगण्यात आले आहे की, मुंबईकरांनी जास्त बाहेर जाऊ नये, तसंच मास्क घालावेत आणि घरात एअर प्युरिफायर चालवावेत.

सफर म्हणजेच सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च’ या संस्थेने नोंदवलेल्या निरीक्षणांतून गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईच्या पश्चिम उपनगरासह, चेंबूर, कुर्ला भागातील हवामान खालावल्याची माहिती समोर आली आहे. बोरिवली, मालाड, अंधेरी, वांद्रे-कुर्ला संकुल, चेंबूर, माझगाव आणि नवी मुंबई या ठिकाणी हवेची गुणवत्ता मध्यम दर्जाची नोंदवण्यात आली आहे. भांडुप, वरळी, कुलाबा येथील हवेची गुणवत्ता उत्तम समाधानकारक स्वरूपाची होती. बोरिवली, मालाड, अंधेरी, वांद्रे-कुर्ला संकुल, चेंबूर, माझगाव या सगळ्याच ठिकाणी प्रदूषकामुळे हवेच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम झाल्याचे समोर आले. यामुळे, मुंबईकरांना श्वसनाच्या आजारांचा सामना करावा लागत आहे.

शुक्रवारी सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च’ (सफर) तर्फे नोंदवलेल्या निरीक्षणातून मालाडची हवा गुणवत्ता मध्यम, त्यानंतर बोरिवली (मध्यम), बीकेसी (वाईट), अंधेरी (मध्यम), कुलाबा ( उत्तम समाधानकारक), माझगाव (मध्यम), वरळी ( मध्यम) , भांडुप (मध्यम), तर चेंबूर (मध्यम) नोंदवण्यात आली आहे. या सतत हवेत होणार्‍या बदलांमुळे डॉक्टरांनी श्वसनासंबंधी आजारांना दूर करण्यासाठी चेहरा झाकावा तसेच विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळल्याने श्वसनासंबंधी आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

गेल्या दोन आठवड्यांत, हवेची गुणवत्ता खालावल्याने आणि बदलत्या हवामानामुळे अप्पर रेस्पीरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे खोकला येणे, शिंका येणे, ताप, छातीत खवखवणे, श्वासोच्छवास अडथळा निर्माण होणे, नाक वाहणे, अंगदुखी अशा तक्रारींनी घेऊन येणार्‍या रुग्णांमध्ये सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच, या रुग्णांपैकी जे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जात आहेत अशा रुग्णांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे, कारण सकाळच्या वेळी हवेत अधिक प्रमाणात धुलिकण असतात जे श्वसनासंबंधी तक्रारी निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. थंडीत सकाळी लवकर फिरणे टाळा, वाफ घ्या असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.

ब्राँकयाटिस, फुफ्फुसातील फायब्रोसिस आणि दम्याचे रुग्ण एअर प्यूरिफायरचा वापर करू शकतात. तसंच, पुढच्या काही दिवसांत हवेतील गुणवत्ता आणखी ढासळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे जर घराबाहेर पडत असाल तर चेहरा झाकावा. धूम्रपान टाळल्यास वायू प्रदूषण कमी होईल, त्यामुळे धुम्रपान टाळणे आवश्यक आहे. शिवाय हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारने कठोर उपाययोजनाही करायला हव्यात. आहारात सफरचंद, जर्दाळू, सोयाबीन, अक्रोड, ब्रोकोली, बेरी यासारखी ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश करावा. संतुलित आहाराचे सेवन करा आणि भरपूर पाणी प्या जेणेकरून शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखता येईल असाही सल्ला डॉक्टर्स देतात.

First Published on: January 12, 2020 3:08 AM
Exit mobile version