पिण्याच्या पाण्याने वाहने धुणार्‍यांना दंड आकारण्याची मागणी

पिण्याच्या पाण्याने वाहने धुणार्‍यांना दंड आकारण्याची  मागणी

washing Vehicle

मुंबईत सध्या कमी दाबाने अपुरा पाणीपुरवठा होत असून लोकांना आता पाण्यासाठी झगडावे लागत आहे. एका बाजुला पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या असताना दुसरीकडे पिण्याचे पाणी वाहने धुण्यासाठी सर्रासपणे वापर केला जात आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा वापर वाहने धुण्यासाठी करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी महापालिकेच्यावतीने भरारी पथके तयार करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

मुंबईतील बहुतांशी भागांमध्ये वाहने धुण्यासाठी गॅरेजेस उघडण्यात आली आहेत. यामध्ये वाहने धुण्यासाठी पिण्याचा वापर केला जातो. त्यामुळे अशाप्रकारे पिण्याचा पाण्याचा अपव्यय करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी भरारी पथक निर्माण करावे,अशी मागणी भाजपच्या नगरसेविका प्रिती सातम यांनी केली आहे. खासगी गॅरेज, वाहन दुरुस्ती केंद्र, गृहनिर्माण सोसायट्यांमधील सुरक्षा रक्षक आणि रस्त्यांवर वाहने धुणार्‍या व्यक्ती यांच्याकडून वाहने धुण्यासाठी मोठ्याप्रमाणात पाण्याचा वापर केला जातो. मात्र यासाठी पिण्याचे पाणी वापरले जाते. परिणामी एका बाजुला नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी झगडावे लागते आणि दुसरीकडे अशाप्रकारे पिण्याच्या पाण्याचा अपव्यय केला जातो. याबरोबरच धुण्यासाठी वापरलेले पाणी आसपासच्या सखल भागांमध्ये साचून डासांचा प्रार्दुभाव होवून साथीच्या आजारांना आमंत्रण दिले जाते. त्यामुळे अशा व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी ठोस उपाययोजना करणे निकडीचे असल्याचे सातम यांनी आपल्या ठरावाच्या सूचनेत म्हटले आहे.

वातावरणातील बदलांमुळे, वर्षागणिक पावसाचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या तलाव क्षेत्रात अपुरा पाणीसाठा जमा होतो. त्यामुळे मुंबईकरांची वर्षाची तहान भागवण्यासाठी प्रशासनाने कपातीचा मार्ग स्वीकारावा लागतो. त्यामुळेच पिण्याचे पाणी भविष्यासाठी साठवून ठेवणे ही काळाची गरज आहे. राज्य शासन आणि महापालिका पाण्याचा अपव्यय टाळून पाणी वाचवण्यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती करत असते. तरीही नागरिक बागकाम, गाड्या धुणे, शौचालयांतील फ्लश अशा कामांसाठी पिण्याचा पाण्याचा सर्रास वापर केला जातो. नागरिकांच्या असहकारामुळे पाणी वाचवण्याचे उद्दिष्ठ्य साध्य होताना दिसून येत नाही.

First Published on: June 24, 2019 4:43 AM
Exit mobile version