२२ हजार शौचकुपांचे स्वप्न, पण प्रत्यक्षात वापरात एकही नाही

२२ हजार शौचकुपांचे स्वप्न, पण प्रत्यक्षात वापरात एकही नाही

नगरसेवकांना निधी लॅप्स होण्याची चिंता, हवीय मुदतवाढ

कुर्ला येथे शौचालयाची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा शौचालयाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.मुंबईत टप्पा ११ अंतर्गत २२ हजार ७७४ शौचकुपांची बांधकामे मंजूर झाली आहेत. त्यातील आतापर्यंत केवळ ४,७८८ शौचकुपांची कामे हाती घेण्यात आली आहे. प्रत्यक्षात ही कामे मंजूर होऊ दीड ते दोन वर्षे उलटत आली तरी यातील शौचकुपे रहिवाशांच्या वापरात आलेली नाहीत.

केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शौचालये बांधण्यासाठी महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. केंद्र आणि पालिकेच्या निधीतून मुंबईत एक लाख शौचकूपे बांधण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मागील चार वर्षांपासून शौचालय बांधणीचे काम सुरू आहे. यामध्ये लॉट-१० अंतर्गत ४,२०४ शौचकूपे बांधण्‍याचे सन २०१६ मध्‍ये प्रस्‍तावित करण्यात आले होते. त्‍यापैकी साडेतीन हजार शौचकूपांचे बांधकाम पूर्ण झाले असून ती शौचकूपे नागरिकांना वापराकरीता उपलब्‍ध करण्‍यात आली आहेत. उर्वरित ५८१ शौचकूपांची कामे सुरू आहे. तर लॉट-११ अंतर्गत २२,७७४ शौचकूपे बांधण्याचे प्रस्‍तावित आहे. त्‍यापैकी १४,१३७ शौचकूपे तोडून नवीन बांधण्यात येणार असून ८,६३७ शौचकूपे नव्‍याने बांधण्‍यात येणार आहेत. या कामांच्‍या निविदा प्रक्रिया पूर्ण करुन कंत्राटदार नेमण्‍यात आले आहेत. त्‍यापैकी २६३ ठिकाणी ४,७८८ शौचकूपांची कामे सुरु करण्‍यात आली आहेत

केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षणात पालिकेला यंदा शून्य गुण मिळाले आहे. या सर्वेक्षणात पंचतारांकित रेटिंगसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांचा मुद्दा महत्त्वाचा ठरत असल्याने प्रशासनाने शौचालयांची संख्या वाढवण्यावर भर दिला आहे. जुनी शौचालये पाडून त्या ठिकाणी अधिकाधिक एकमजली व दुमजली शौचालये बांधली जाणार आहेत. मात्र मुंबईतील वाढत्या लोकसंख्येच्या मानाने शौचालयांची संख्या कमी आहे. ३५ ते ५० नागरिकांमागे सार्वजनिक शौचालयात एक शौचकुप बांधण्यात येते. प्रत्यक्षात या शौचकुपाचा त्यापेक्षा तिप्पट वापर होतो. काही ठिकाणी दिवसभरात २०० हून अधिक नागरिक एका शौचकुपाचा वापर करत असल्याचे पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. ‘शौचालयांची संख्या वाढवण्यात येत असल्याचे पालिकेने वेळोवेळी जाहीर केले असली ही घोषणा फसवी असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे पालिकेतील गटनेते आमदार रईस शेख यांनी केला आहे. मोफत शौचालये हे तर स्वप्नच आहे’, असे शेख यांनी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पाठवलेल्या पत्रात नमुद केला आहे.

महिलांसाठी तीन हजार २३७ शौचालये

मुंबईत महिला आणि पुरुषांच्या सार्वजनिक शौचालयांच्या संख्येत मोठी तफावत आहे.
महिलांसाठी एकूण तीन हजार २३७ शौचालये आहेत. यामध्ये शहर भागात एक हजार ४९९, पश्चिम उपनगरात ९४१ व पूर्व उपनगरात ७७७ शौचालये आहेत. तर पुरुषांच्या शौचालयाची संख्या नऊ हजार ६४० असून शहरात चार हजार ७६२, पश्चिम उपनगरात दोन हजार ६६७ व पूर्व उपनगरात दोन हजार २१७ शौचालयांचा समावेश आहे.

म्हाडा-पालिका वादात दुरूस्ती रखडली

शहर आणि उपनगरातील झोपडपट्ट्यांमध्ये सुमारे ७० हजार शौचकुपे असून ही शौचालये म्हाडाने बांधली आहेत. ही शौचालये अनेक वर्ष जुनी आहेत. ती वारंवार खचत आहेत. त्यामुळे ही शौचालये पालिकेच्या ताब्यात देण्याची तयारी राज्य सरकारने दर्शवली होती. पण पालिकेने या शौचालयांची दुरूस्ती म्हाडाने करून द्यावी,तरच पुढची देखभाल करू अशी अट घातली. त्यामुळे हा तिढा सुटू शकलेला नाही.


हेही वाचा – इंदोरीकरांच्या खटल्यातून सरकारी वकिलांची माघार

First Published on: November 24, 2020 8:54 PM
Exit mobile version