वीज रोहित्र नादुरुस्त झाल्याने विजेचा खेळखंडोबा

वीज रोहित्र नादुरुस्त झाल्याने विजेचा खेळखंडोबा

load shedding

वीज ग्राहकांनी बोटीवरील बॅटर्‍या एकाच वेळेस चार्जिंगसाठी लावल्या होत्या. त्यामुळे भार वाढून रोहित्र तीनवेळा नादुरुस्त होऊन वीजपुरवठा खंडीत झाला होता, असे महावितरणने केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे. यावर उपाय म्हणून अर्नाळा परिसरात आणखी एक रोहित्र बसवून भार वाढवण्यात येणार आहे.

अर्नाळ्यातील अनेक भागात चार दिवसापासून वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे संतापलेल्या गावकर्‍यांनी रविवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यानंतर महावितरणने रोहित्रातील बिघाड दूर करून वीज पुरवठा पूर्ववत केला होता.

अर्नाळा येथील 325 केव्हीए क्षमतेच्या रोहित्रावरून सुमारे 630 वीजग्राहकांना वीजपुरवठा करण्यात येतो. यापैकी बहुतांश वीजग्राहक मत्स्य व्यावसायिक आहेत. पुढील काही दिवसांत त्यांचा व्यवसाय सुरू होत असल्याने यातील बहुतांश वीज ग्राहकांनी आपल्या बोटीवरील बॅटरी एकाच वेळेस चार्जिंगकरिता लावल्या. परिणामी रोहित्रावरील भार वाढून रोहित्र तीन वेळा नादुरुस्त झाले. यावेळी नादुस्तीचे कारण शोधण्यासाठी महावितरणच्या अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष घरोघरी जाऊन रोहित्र बिघाडाचा शोध घेतला असता वरील वस्तुस्थिती आढळून आल्याची माहिती महावितरणचे कल्याण परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी विश्वजित भोसले यांनी दिली.

महावितरणच्या अधिकार्‍यांनी दुरुस्त करून वीजपुरवठा पूर्ववत केला. याशिवाय या भागातील ग्राहकांना अधिक चांगली सेवा मिळावी म्हणून महावितरणकडून अर्नाळा येथे लवकरच अजून एक रोहित्र उभारण्यात येणार आहे.

अर्नाळा येथील 600 ग्राहकांपैकी 203 ग्राहकांकडे 12 लाखाची थकबाकी असून ती न भरल्यास महावितरणने करवाईचा ईशारा दिला आहे. तसेच वीज चोरीवर आळा घालण्यासाठी धडक कारवाई केली जाणार आहे.

एकाचवेळेस मोठ्या प्रमाणात रोहित्रावरील भार वाढल्यामुळे रोहित्र नादुरुस्त होतात. ग्राहकांनी याची जाणीव ठेवून महावितरणला सहकार्य करावे आणि अनधिकृत वीजवापर थांबवावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

First Published on: July 24, 2019 4:40 AM
Exit mobile version