जागा एसटीची अतिक्रमण आंबा पेट्या विक्रेत्यांचे

जागा एसटीची अतिक्रमण आंबा पेट्या विक्रेत्यांचे

गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या एसटी महामंडळाच्या तुर्भे बस डेपोला अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. नुकताच हापूस आंबा एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाला असता या आंब्याच्या रिकाम्या पेट्यांनी या जागेत अतिक्रमण केले आहे. सध्या या बंद एसटी डेपोच्या मोकळ्या जागेला कोणीच वाली नसल्याने अतिक्रमणाचा पसारा हळूहळू वाढू लागला आहे. भविष्यात या ठिकाणी भक्कम अतिक्रमण उभारण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची चर्चा या परिसरात आहे.

तुर्भे सेक्टर 20 मधील एसटी महामंडळाच्या जागेत सध्या आंब्याच्या पेट्या विक्री करणार्‍या व्यापार्‍यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. परप्रांतीय मार्केटच्या मागच्या पदपथावर रिकाम्या पेट्या ठेवून पदपथ काबीज करतात. मात्र यावर मनपा कारवाई करत असल्याने त्यानी थेट एसटीच्या मोकळ्या जागेत आपला मोर्चा वळवला आहे. या ठिकाणी मनपाच्या कारवाईची भीती नसल्याने वाहने पार्किंग, डेब्रिज धारकांनी ही लक्ष केंद्रित केले आहे. एसटी महामंडळाने बस डेपोसाठी काही वर्षापूर्वी सिडको कडून भाडे तत्वावर तुर्भे से 20 आणि सेक्टर 26 कोपरी गाव येथे भूखंड घेतले. त्यानंतर एसटी महामंडळाकडून काही वर्षे तुर्भे याठिकाणी डेपो सुरू करण्यात आला. त्याचवेळी वाढत्या वाहनाच्या गर्दीमुळे महामंडळाने येथील डेपो बंद करून वाशी डेपो ,हायवे व सानपाडा हायवे वरील बस थांब्याचा वापर सुरू केला. त्यात सेक्टर 26 येथील भूखंड आजही तसाच पडून राहिला आहे.

वाढत्या शहरीकरणामुळे दिवसेंदिवस गर्दी ही वाढू लागली त्यात एपीएमसी मार्केट चे स्थलांतर वाशी येथे झाल्याने आणखीन गर्दी वाढली. त्यात मार्केटमध्ये येणार्‍या वाहनांची, ग्राहक व व्यापारी यांची संख्या ही वाढली,वाढत्या व्यापारामुळे वाहने देखील वाढली त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ लागली. मात्र अनेकांनी वाहतूक कोंडी सुटली जावी यासाठी थेट बंद एसटी डेपोच्या जागेत वाहने पार्किंग करू लागले. आता तर परप्रांतीयांच्या पेट्यांनी जागा काबीज केली आहे. सध्या त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे.

First Published on: April 15, 2019 4:02 AM
Exit mobile version