महाआघाडीत बिघाडी

महाआघाडीत बिघाडी

प्रातिनिधिक फोटो

अगोदर जागा वाटपाचे ठरवा तरच प्रचार करू, असा हट्ट काँग्रेसने धरल्यामुळे पालघर लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन विकास आघाडी सोबत झालेल्या महाआघाडीत बिघाड झाला आहे. लोकसभेसाठी काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,आर.पी.आय, सीपीएम,सीपीआय,जनता दल (से),बहुजन विकास आघाडीसह अनेक पक्षांची मिळून महाआघाडी स्थापन करण्यात आली. या महाआघाडीतर्फे बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव हे निवडणूक लढवीत आहेत.

त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना वरील सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे आघाडीची एकी दिसून आली होती. मात्र,या आघाडीत तूर्तास बिघाड झाला आहे. काँग्रेसचे प्रदेश सचिव विजय पाटील यांनी बहुजन विकास आघाडीवरच थेट हल्ला बोल केला आहे. आम्ही औपचारिकता म्हणून तुमच्यासोबत अर्ज भरायला आलो, त्यानंतर मात्र, बोलणी झाली नाही.

आम्ही तुमचा प्रचार का करावा, याचे उत्तर मात्र मिळाले नाही. आगामी विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती,ग्रामपंचायत निवडणुकीत तुम्ही आम्हाला काय देणार ते अगोदर कबूल करा, तरच आम्ही तुमचा प्रचार करू असे विजय पाटील म्हणाले आहेत. वसई आणि पालघर विधानसभा काँग्रेससाठी सोडा,अशी मागणी बहुजन विकास आघाडीच्या एका नेत्याकडे करतानाच,वसई-विरार महापालिकेत किती जागा सोडणार ? याचीही कबुली द्या, असे पाटील यांनी ठणकावले आहे. त्यामुळे आघाडीत काँग्रेसचा बिघाड झाला आहे.

तर दुसरीकडे जनता दल (से) चे पालघर जिल्हा अध्यक्ष प्रकाश लवेकर यांनी महाआघाडीला पाठींबा दिला असतानाच वसई-विरार जिल्हाध्यक्ष निमेश वसा यांनी बहुजन विकास आघाडीला पाठींबा देण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही नेहमीच बहुजन विकास आघाडी विरोधात लढलो आहोत, मग त्यांना आता पाठींबा का देणार असे सांगून महाआघाडीत जनता दलाचाही बिघाड असल्याचे स्पष्ट केले आहे.

First Published on: April 12, 2019 4:58 AM
Exit mobile version