डॉक्टर, इंजिनिअरसोबत कुशल कामगार देण्याची आवश्यकता

डॉक्टर, इंजिनिअरसोबत कुशल कामगार देण्याची आवश्यकता

राज्यपाल सी. विद्यासागर राव

भारतात जगातील सर्वोत्कृष्ट माहिती तंत्रज्ञान अभियंते आणि डॉक्टर निर्माण होत आहे. पण येणार्‍या काळात जगाला सर्वोत्तम कारागीर, सुतार, प्लंबर, नर्स, पॅरामेडिकोज, शेतकरी देण्याची व्यवस्था निर्माण करणे आवश्यक असल्याचे मत राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी व्यक्त केले. आयटीआयच्या विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.कोणत्याही विषयातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येते. परंतु आयटीआयमधून शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्याला अशी कोणतीही पदवी दिली जात नाही. परंतु त्यांचाही सत्कार व्हावा या उद्देशाने सोमवारी जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून उत्तीर्ण होणर्‍या प्रशिक्षणार्थ्यांबरोबरच उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था व सहभागी औद्योगिक संस्थांना सन्मानित करण्यात आले.

भारतातील कुशल कामगार अन्य देशांमध्ये नोकरी करत आहेत. परंतु त्यांच्या कामाला पाठबळ मिळाल्यास ते देशातच काम करतील याचा फायदा मोठ्या प्रमाणात भारताला होईल, असे सांगत राज्यपालांनी उपस्थितांना जागतिक युवा कौशल्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 2015 मध्ये कौशल्य भारत अभियानाची सुरूवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला जगाची कौशल्य राजधानी बनविण्याचा संकल्प व्यक्त केला होता. या दिशेने वाटचाल म्हणून सरकारने २०२२ पर्यंत ४०० दशलक्ष लोकांना विविध उपक्रमांद्वारे कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. 2022 पर्यंत ४.५ कोटी युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य महाराष्ट्र पूर्ण करेल अशी अपेक्षा राव यांनी व्यक्त केली.

तरुणांना कृषी क्षेत्रातील प्रशिक्षण गरजेचे
निम्म्याहून अधिक लोकसंख्येसाठी शेती हे रोजगाराचे साधन आहे. अन्न उत्पादन, फलोत्पादन, डेअरी आणि मत्स्यपालन या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रात प्रचंड क्षमता आहे. या क्षेत्रातील तरुणांना योग्य कौशल्य प्रशिक्षण दिल्यास महाराष्ट्र संपूर्ण जगाला शेतीमधील कौशल्य आणि मनुष्यबळ प्रदान करू शकेल. यासाठी कृषी विज्ञान केंद्रे, कृषी महाविद्यालये आणि विद्यापीठे यांची भूमिका महत्त्वपूर्ण असेल. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे मजबूतीकरण आणि उन्नतीकरण करुन शेतकर्‍यांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास विभागाने पुढाकार घेतला आहे, असेही ते म्हणाले.

First Published on: July 16, 2019 4:49 AM
Exit mobile version