राज्यात लॉकडाऊनचा विचार नाही; अद्यापही दुसरी लाट नाही

राज्यात लॉकडाऊनचा विचार नाही; अद्यापही दुसरी लाट नाही

दिल्ली, केरळ, गोवा, गुजरातमध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर देशात दुसरी लाट येऊन लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे बोलले जात असले तरी महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्याचा कोणताही विचार नाही. परंतु काही प्रमाणात निर्बंध लावण्यात येतील. राज्यात दुसरी लाट आली नसून, नियम पाळल्यास परिस्थिती हाताबाहेर जाणार नसल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती देशाच्या तुलनेत समाधानकारक आहे. दिल्ली, गुजरात, केरळ रुग्णसंख्येत वाढ होत असली तरी महाराष्ट्रातील अद्यापही दुसरी लाट आलेली नसल्याने सध्या आपण सेफ झोनमध्ये आहोत. जेव्हा आपण शून्यावर येतो त्यानंतर वाढलेली रुग्णसंख्या म्हणजे पहिली किंवा दुसरी लाट असते. परंतु आपण शून्यावर गेलोच नसल्याने आपल्याकडे पहिली लाट येऊन गेली असे म्हणता येणार नाही, असे आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केले. लॉकडाऊनबाबत अद्याप कोणतीही चर्चा नाही. त्यामुळे कोणीही पॅनिक होऊ नये. मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन लॉकडाऊनसंदर्भातील गैरसमज दूर केले. राज्य सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शन सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे नागरिकांसाठी महत्त्वाचे आहे.

दिल्लीमध्ये तिसर्‍या लाटेनंतर मास्क न घालणार्‍यांना एक हजार रुपयांचा दंड जाहीर करण्यात आला. तर गुजरामध्ये शाळा उघडल्यानंतर पुन्हा बंद करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आपण कोरोना चाचण्या करण्याचे टार्गेट जिल्हाधिकार्‍यांना देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दुध, पेपरवाले, भाजीपाला विक्रेत्यांच्या लसी वाढवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

लसीकरणासंदर्भात समिती गठित

राज्य सरकारने लसीकरणाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. देशात सध्या पाच लसींवर काम सुरू आहे. ही समिती नेमकी कोणती लस वापरायची, त्याचा डोस किती, आर्थिक भार किती असेल याबाबत ही अभ्यास करून त्याचा अहवाल सादर करेल. या समितीमध्ये विविध विभागाचे सचिव व आरोग्य सचिवांचा समावेश आहे.

First Published on: November 24, 2020 6:42 PM
Exit mobile version