कोरोनामुळे उद्भवलेल्या मानसिक समस्यांच्या निराकरणासाठी विद्यापीठाचा पुढाकार

कोरोनामुळे उद्भवलेल्या मानसिक समस्यांच्या निराकरणासाठी विद्यापीठाचा पुढाकार

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतासह इतर देशांत लॉकडाऊन करण्यात आला आहे. या विषाणूच्या उद्रेकामुळे अनेकांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. त्यांना चिंता, अनिश्चितता, निराशा, सामाजिक विलगीकरण आणि असुरक्षितपणाचा सामना करणे कठीण जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने पुढाकार घेऊन कोरोनाच्या मानसिक परिणामास सामोरे जाण्यासाठी विद्यापीठाच्या उपयोजित मानसशास्त्र विभागाने ऑनलाइन मानसिक आरोग्य सहाय्य सेवा सुरू केली आहे. ही समुपदेशन सेवा वेब-आधारित असून, विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. विवेक बेल्हेकर यांनी ही ऑनलाईन समुपदेशनाची संकल्पना आखली आहे

तीन टप्प्प्यात ऑनलाईन समुपदेशन

ऑनलाईन समुपदेशनाची ही प्रक्रिया तीन सोप्या टप्प्प्यात होत आहे. यामध्ये समुपदेशन विनंतीची ऑनलाइन नोंदणी, ऑनलाइन मानसशास्त्रीय चाचणी, आणि त्यानंतर ऑनलाईन समुपदेशनाचा समावेश आहे. नोंदणी करणाऱ्यांना मानसशास्त्रीय मूल्यांकन आणि समुपदेशनासाठी एक लिंक प्राप्त होईल. समुपदेशन सुविधा ही मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध असल्याचे डॉ. विवेक बेल्हकर यांनी सांगितले. याव्यतिरिक्त, या प्रक्रियेमध्ये मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबतच्या माहितीचे हँडआउट्स विकसित केले आहेत जे मानसिक आरोग्याच्या विविध समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त असतील. त्यामध्ये भावनिक समस्या, घरातून काम करणे आणि कार्यक्षमतेच्या संबंधित समस्या, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित समस्या आणि इतर बऱ्याच मुद्यांचा समावेश केला आहे. प्रादेशिक भाषिक विविधता लक्षात घेता सध्या माहितीपत्रके ही मराठी, हिंदी, गुजराती, बंगाली, कन्नड आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या या संकटकालीन परिस्थितीत मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी मुंबई विद्यापीठाने समुपदेशन सुविधेसाठी घेतलेला पुढाकार ही काळाची आणि तातडीची गरज आहे
– प्रा. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

विभागातील सर्व प्राध्यापक समुपदेशन कार्यक्रमाचा भाग असून, डब्ल्यूएचओ, एपीए आणि अन्य व्यावसायिक मार्गदर्शक तत्त्वे वापरून विभागाने एक कोव्हीड १९ समुपदेशन प्रोटोकॉल विकसित करताना आपल्या सांस्कृतिक घटकांचा विचार केला आहे. कोव्हिड १९ च्या उद्रेकाशी संबंधित विशिष्ट प्रश्नांचा सामना करण्यासाठी सर्व प्राध्यापकांचे सखोल ऑनलाइन प्रशिक्षण घेण्यात आले. डॉ. विल्बर गोन्साल्विस आणि डॉ. उमेश भरते यांनी वेब-आधारित समुपदेशन प्रोटोकॉलमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले असून विद्यापीठाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे यास सहकार्य लाभले असल्याचे डॉ. विवेक बेल्हेकर यांनी सांगितले.

नोंदणीसाठी संपर्क

विद्यापीठाने सुरू केलेल्या या ऑनलाईन समुदेशन सेवेच्या नोंदणीसाठी खालील लिंक तयार केली आली असून त्यावर संपर्क साधण्याचे विभागाने सांगितले आहे.

https://forms.gle/Uhb5f2SPfEC8YL39A हा संपर्क दुवा


LockDown: अडकलेल्या कर्मचाऱ्यांना आणण्यासाठी लालपरी थेट त्यांच्या गावात

First Published on: April 6, 2020 5:44 PM
Exit mobile version