हृदयविकाराच्या कृत्रिम झटक्याचा प्रयोग; वाचवले महिलेचे प्राण

हृदयविकाराच्या कृत्रिम झटक्याचा प्रयोग; वाचवले महिलेचे प्राण

हृदयविकाराच्या कृत्रिम झटक्याचा प्रयोग

हायपरट्रॉफिक ऑब्स्ट्रक्टिव्ह कार्डियामायोपथी (एचओसीएम) या अनुवंशिक आजाराच्या उपचारासाठी हृदयविकाराचा कृत्रिम झटका देऊन वोक्हार्ट रूग्णालयातील डॉक्टरांनी एका महिलेचे प्राण वाचवले आहेत. आपण सर्व हार्ट अॅटॅकला नेहमी घाबरत असतो. मात्र, त्या दिवशी ज्या महिलेवर नियंत्रित कृत्रिम हार्ट अॅटॅकचा प्रयोग करण्यात आला. त्या मात्र आपले प्राण वाचवले म्हणून डॉक्टरांचे आभार मानत घराकडे रवाना झाल्या आहेत. या घटनेत ६५ वर्षीय सुनीता पवार काही वर्षापासून श्वसनाच्या समस्येने पीडित होत्या. त्यामुळे त्यांना अस्थमावरील उपचारांसाठी वोक्हार्ट रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांच्या हृदयावर कृत्रिम झटका देऊन त्यांचे प्राण वाचवण्यात आले आहे.

एचओसीएम दुर्मीळ अनुवांशिक आजार

याविषयी हृदयविकार शल्यविशारद डॉ. रवी गुप्ता यांनी सांगितलं की, ‘सुनीता यांच्या छातीतून मोठ्या आवाजातील घरघर ऐकू येत होती. त्यांच्या हृदयाची अवस्था जाणून घेण्यासाठी आणि हृदयाच्या रचनेत काही दोष आहे का? ते पडताळून पाहण्यासाठी त्यांची २ डी इको ही चाचणी केल्यावर त्यांना हायपरट्रॉफिक ऑब्स्ट्रक्टिव्ह कार्डियोमायोपथी (एचओसीएम) हा अत्यंत दुर्मीळ प्रकारचा अनुवांशिक आजार असल्याचे निदान झाले. हृदयातील स्नायूंच्या उती असाधारणपणे जाड झाल्या तर हा आजार होतो’.

डॉ. गुप्ता पुढे म्हणाले, ‘त्यांच्या हृदयातील स्नायू जाड होते. जाड स्नायूंमुळे रक्तप्रवाहाचा मार्ग निमुळता झाल्याने हृदयातून बाहेर पडणाऱ्या रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण झाला होता. यावर उपचार करण्यासाठी औषधांचा पर्याय उपलब्ध होता. पण ही औषधे श्वसनमार्गाचा दमा असलेल्या व्यक्तींसाठी वर्ज्य असतात. त्यामुळे हे शक्य नव्हते. ओपन हार्ट शस्त्रक्रिया हा दुसरा पर्याय होता. पण त्यात खूपच जोखीम असल्याने तेही शक्य नव्हते. तिसरा पर्याय म्हणजे स्नायूंमधील रक्तपुरवठा कमी करणे, जेणेकरून स्नायूंची जाडी कमी करता जाईल’.

कशी केली जाते शस्त्रक्रिया ?

या उपचारांमध्ये त्या विशिष्ट जाड्या स्नायूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनी अडथळा निर्माण करून कॅथेटरमधून थोडेसे शुद्ध अल्कोहोल त्या स्यानूला पुरवण्यात येते. हे अल्कोहोल रक्तपुरवठ्याला अडथळा निर्माण करणाऱ्या अतिरिक्त उतीला नष्ट करते. त्यामुळे छातीमध्ये हलकीशी वेदना किंवा अस्वस्थ वाटणे (हृदयविकाराचा झटका) येऊ शकतो. या शस्त्रक्रियेला अल्कोहोल सेप्टल अॅब्लेशन असे म्हणतात. एचओसीएमवर उपचार करण्यासाठी या प्रक्रियेचा वापर केला जातो. या आजारातही हृदयविकाराच्या झटक्यासारखीच गुंतागुंत असते.


वाचा – नव्या वर्षातलं पाचवं अवयवदान! वोक्हार्टमध्ये झाली शस्त्रक्रिया

वाचा – संसर्ग रोखत डॉक्टरांनी वाचवले प्राण


 

First Published on: February 18, 2019 9:53 PM
Exit mobile version