खंडणी मागणार्‍या दोन अपहरणकर्त्यांना अटक

खंडणी मागणार्‍या दोन अपहरणकर्त्यांना अटक

तिसरीत शिकणार्‍या लहान मुलाचे अपहरण करून त्याच्या मोबदल्यात 3 लाखांची खंडणी मागणार्‍या दोघांना श्रीनगर पोलीस ठाणे आणि वागळे इस्टेट पोलिसांच्या संयुक्त पथकाने पाठलाग करून पकडले. कल्पनाथ चौहान(टीव्ही मॅकेनिक) आणि सिकंदर झकरी चौहान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 13 जानेवारी रोजी अपहरण करण्यात आलेल्या क्रिश योगेंन्द्रकुमार जैस्वार याची सुटका करण्यात आली. याप्रकरणी तपास करताना पोलिसांना पोलीस मित्रांचीही मदत झाली. योगेंद्रकुमार जैस्वार (रा. इंदिरा नगर, वागळे इस्टेट ठाणे) यांचा इयत्ता तिसरीत शिकणारा मुलगा क्रिश याचे 13 जानेवारी रोजी परिसरातून अपहरण झाले.

या प्रकरणी कुटुंबियांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली होती. या घटनेचा तपास पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. दरम्यान, 15 जानेवारी रोजी योगेंन्द्रकुमार यांना ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातून निनावी फोन आला. मुलाची सुटका करून घ्यायची असेल तर 3 लाख रुपये तुमच्या परिसरातील टीव्ही मॅकेनिक असलेल्याकल्पनाथ चौहान (इंदिरा नगर टेकडी) याच्याकडे द्या, असे सांगितले. त्यावरून कल्पनाथवर अपहरण केल्याचा संशय बळावला. याबाबतची माहिती मुलाच्या वडिलांनी पोलिसांना दिली. त्यानुसार मुलाला सोडविण्याची रणनिती
तयार करण्यात आली. या घटनेनंतर कल्पनाथ स्वत:हून मुलाच्या सुटकेसाठी फोन किंवा पत्र आले का? अशी चौकशी मुलाच्या वडिलांकडे करू लागला. यावर त्यांनी सुटकेसाठी फोन किंवा पत्र आले नसल्याचे सांगितले. त्यामुळे दुसर्‍या दिवशी कमलनाथने योगेन्द्रकुमार यांच्या घरी जाऊन एक चिठ्ठी टाकली. त्यामध्ये 3 लाखांची रक्कम कल्पनाथ चौहान याला देऊन दादर येथे पाठवा, असे लिहिले होते. त्यानुसार 3 लाखांची रक्कम कल्पनाथला देऊन दादरला पाठवण्यात आले. यावेळी कल्पनाथच्या मागावर पोलिसांचे पथक होते.

पोलिसांनी कल्पनाथ याचे फोन लोकेशन भिवंडी येथे असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. त्यावेळी कल्पनाथ हा भिवंडी येथील नारपोली गाव रोड एकता नगर येथे एका घरात शिरला व त्याने त्याच्याकडील 3 लाख रक्कम त्या घरातील इसमास दिली त्यावेळी सदर घरात अपहरण झालेला मुलगा क्रिश होता. पोलिसांनी क्रिशला सुरक्षितपणे ताब्यात घेतले आणि आरोपी कल्पनाथ आणि सिकंदर या दोघा भावांना अटक केली या गुह्यात मुख्य सूत्रधार टीव्ही दुरुस्त करणारा कल्पनाथ असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक आर एस गोसावी करीत आहेत.

First Published on: January 20, 2019 5:37 AM
Exit mobile version