शिवसेना-भाजप युती होणारच – उद्धव ठाकरे

शिवसेना-भाजप युती होणारच – उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपावरुन भाजप आणि शिवसेनेमध्ये मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा निवडणुकीत युती होणार, अशी ठाम भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे. याशिवाय येत्या एक ते दोन दिवसांत युतीची घोषणा होईल, अशी देखील माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. विदर्भातील वसंतराव नाईक शेतकरी स्वालंबन मिशनचे अध्यक्ष आणि भाजपशी संबंधित असलेले शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला. याच पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी युतीबाबत विचारलेल्या विविध प्रश्नांवर उत्तरे दिली.

विदर्भातील वसंतराव नाईक शेतकरी स्वालंबन मिशनचे अध्यक्ष आणि शेतकरी नेते किशोर तिवारी यांचा शिवसेनेत प्रवेश

‘लोकसभा निवडणुकीच्या आधीच युतीचा फॉर्म्युला ठरलाय’

लोकसभा निवडणुकीच्या आधीच विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना युतीचा फॉर्म्युला ठरला आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ‘गेल्या काही दिवसांपासून युती हा विषय गाजतोय. लोकसभा निवडणुकीच्या आधीच आम्हा तिघांमध्ये युतीचा फॉर्म्युला ठरलाय. युतीबाबत आम्ही वेगळी पद्धत अवलंबली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनीच शिवसेनेची यादी जाहीर करावी, हे उपहासात्मक नाही’, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कोकणातील नाणार प्रकल्प आणि आरे कारशेडबाबत आपली भूमिका मांडली. ‘विकास कामाबद्दल विरोध नाही, आरेत कारशेडला आमचा सकारण विरोध आहे. नाणारबाबतही तसेच आहे’, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – मोदींनी टीका केलेला बडबोलपणा करणारा नेता कोण?

‘बयानबाजी नाही, मी हिंदूंच्या बाजूने बोलतोय’

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी नाशिकमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. ‘रखडलेल्या राम मंदिराबाबत एक नेता मागील वर्षी अयोध्येत गेला होता. तेथे त्याने उगाचच बयानबाजी केली’, असे मोदी म्हणाले होते. यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘मी बयानबाजी नाही, हिंदुंच्या वतीने बोलतोय. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. मात्र, खूप वर्षांपासून हा खटला सुरु आहे. आता राम बंदिरासाठी मी पुन्हा एकदा अयोध्येत जाणार’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

First Published on: September 20, 2019 3:41 PM
Exit mobile version