वाढदिवशी वृक्षारोपणाची चमकोगिरी

वाढदिवशी वृक्षारोपणाची चमकोगिरी

Plantation

अंबरनाथ येथील खुंटवली परिसरात उद्धव ठाकरे यांच्या 58 व्या वाढदिवसानिमित्त जवळपास 58 हजार झाडे लावली गेली होती. मात्र, ही सर्व झाडे सुकून आणि जळून नष्ट झालेली आहेत. जर झाडांची अशीच अवस्था करायची होती तर वृक्षारोपण करण्याचे नाटक का केले? अशी टीका या वृक्षारोपणवर होत आहे.

शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 58 व्या वाढदिवसानिमित्ताने 28 जुलै 2018 रोजी अंबरनाथ ( प ) येथील खुंटवली परिसराच्या डोंगर माथ्यावर 58 हजार झाडे लावण्यात आली होती. यावेळी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, नानासाहेब धर्माधिकारी फाऊंडेशन, अंबरनाथ नगरपालिका , वन विभाग आणि सामाजिक संघटनांनी या वृक्षारोपण मोहिमेत भाग घेतला होता. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे , ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे, गोपाळ लांडगे , आमदार डॉ. बालाजी किणीकर, अंबरनाथ शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर आणि शिवसेनेचे अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर येथील शिवसेना नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. आता मात्र ही झाडे सुकून गेली आहेत आणि या झाडांचे नामोनिशाण राहिलेले नाही. यासंदर्भात शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांना विचारले असता ते म्हणाले की, काही झाडे जळाली आहेत, तर काही छोटी आहेत, तरीदेखील मी माहिती घेऊन आपणास सांगतो असे उत्तर दिले.

वालधुनी बिरादरी या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष शशिकांत दायमा म्हणाले की, ही झाडांची हत्या असून, याप्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. एका झाडाची किंमत 200 ते 300 लावली आहे. अशी मला माहिती मिळाली असून, यात भ्रष्टाचार झाल्याची शक्यता त्यांनी वर्तवली.

First Published on: April 9, 2019 4:26 AM
Exit mobile version