वंचित बहुजन आघाडीवर दुसऱ्याच दिवशी उमेदवार बदलण्याची नामुष्की!

वंचित बहुजन आघाडीवर दुसऱ्याच दिवशी उमेदवार बदलण्याची नामुष्की!

भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर

१५ मार्च रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते प्रकाश आंबेडकर यांनी ३७ उमेदवारांची यादी जाहीर केली. काग्रेसशी चर्चा फिस्कटल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात ४८ जागांवर उमेदवार उभे करण्याची त्यांनी घोषणा देखील केली. मात्र नमनालाच घडाभर तेल लागावं या उक्तीप्रमाणे उमेदवारी जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ईशान्य मुंबईतला उमेदवार बदलण्याची नामुष्की आघाडीवर आली आहे. या उमेदवाराचं नाव जाहीर केल्यानंतर लगेचच त्याला स्थानिक जनतेच्याही आधी भारिप बहुजन महासंघाच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडूनच विरोध होऊ लागला. उमेदवाराच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आक्षेप घेतला गेला. आणि सर्वात कडी म्हणजे भारिपच्या मुंबई प्रवक्त्यांना देखील उमेदवाराच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीविषयी माहिती नव्हतं!

गुन्हेगारी पार्श्वभूमीचा उमेदवार

शुक्रवारी प्रकाश आंबेडकरांनी एमआयएमचे वारिस पठाण यांच्यासोबत मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्येच ईशान्य मुंबई मतदारसंघातून संभाजी काशीद या उमेदवाराच्या नावाची घोषणा त्यांनी केली. मात्र, त्यानंतरच या उमेदवाराला बदलण्याची मागणी केली जाऊ लागली. भारिपच्याच काही कार्यकर्त्यांनी तर उमेदवार बदलण्यासाठी थेट प्रकाश आंबेडकरांना पत्रच दिलं. ‘हा उमेदवार जातीय काम करत असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. अनेक गुन्हे सदर व्यक्तीच्या नावावर आहेत. त्यामुळे पक्षाचं नाव खराब होऊन जनाधार कमी होण्याची शक्यता आहे’, असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

आनंदराज किंवा भीमराव असतील असं वाटलं होतं. पण हा उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. भांडुपमधल्या एका हत्या प्रकरणात या उमेदवाराचं नाव आहे.

वामन सुराडकर, कार्यकर्ता, भारिप बहुजन महासंघ

दरम्यान, यासंदर्भात जेव्हा ‘आपलं महानगर’ने भारिपच्या मुंबईतील पदाधिकारी रेखा ठाकूर यांच्याशी संपर्क केला, तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर धक्कादायक असंच होतं.

काल प्रकाश आंबेडकरांनी नावं जाहीर केल्यानंतरच आम्हाला या उमेदवाराबद्दल फोन येऊ लागले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पत्र देण्याआधीच संबंधित उमेदवार बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन उमेदवाराचं नाव येत्या काही दिवसांमध्ये जाहीर करण्यात येईल. पण हा उमेदवार कसा निवडला गेला, हे मला देखील माहीत नाही.

रेखाताई ठाकूर, मुंबई पदाधिकारी, भारिप

उमेदवारांची निवड नक्की होते कशी?

वास्तविक खासदारकीसाठी उमेदवार निवडताना सर्व प्रकारची शहानिशा करूनच नाव अंतिम केलं असावं, असा साधारण मतदारांचा समज असतो. बऱ्याच अंशी ते खरं देखील असतं. पण इथे तर उमेदवाराच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्या पक्षालाच त्या उमेदवाराबद्दल इतकी महत्त्वाची गोष्ट इतरांकडून कळत असेल, तर उमेदवारांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं. आता तरी पुढचा उमेदवार व्यवस्थित खातरजमा करूनच जाहीर करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


हेही वाचा – इम्तियाज जलील बंडखोरीच्या तयारीत?
First Published on: March 16, 2019 8:37 PM
Exit mobile version