कर्नाटकातील ‘वेणुगोपाल’ बनलेले ‘डॉ. आंबेडकर’

कर्नाटकातील ‘वेणुगोपाल’ बनलेले ‘डॉ. आंबेडकर’

BABASAHEB AMBEDKAR PRATIKRUTI

डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून दादरमधील चैत्यभूमीवर भीमसमुदाय जमला होता. या प्रचंड गर्दीतसुद्धा एक माणूस प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत होता. प्रत्येकजण हातातल्या मोबाईलवर त्या व्यक्तीसोबत स्वत:चा फोटो काढण्यासाठी धडपडत होता. कर्नाटकातल्या बंगळुरुमधून येवून अगदी हुबेहुब बाबासाहेबांसारखी वेषभुषा परीधान करणारे वेणुगोपाल यांनी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखाच पेहराव, डोळ्यावर अगदी तश्याच पद्धतीचा चष्मा आणि हातात भारताचे संविधान घेवून फिरणार्‍या वेणुगोपाल यांनी चैत्यभूमीत दाखल झालेल्या भीमअनुयायांना अगदी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भेटल्याचा आभास निर्माण करून दिला.वेणुगोपाल हे बंगळुरुमध्ये एका खासगी कंपनीतील निवृत्त कर्मचारी आहेत.

गुरुवारी महापरीनिर्वाण दिनानिमित्त पहिल्यांदाच ते मुंबईत आले होते. स्वखर्चाने बाबासाहेबांसारखी वेषभुषा करुन ते देशातील विविध ठिकाणी जातात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी निगडीत असणार्‍या अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी आतापर्यंत आवर्जून हजेरी लावली आहे. अगदी हुबेहुब दिसण्यामुळे प्रत्यक्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आपल्यासमोर उभे आहेत, असा आभास होत होता. त्यामुळे भीम अनुयायांकडून आपल्या कौतुकाचा वर्षाव होत आहे, अशी प्रतिक्रिया वेणुगोपाल यांनी दैनिक ‘आपलं महानगर’शी बोलताना व्यक्त केली. डॉ. आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानात सर्वांना समान हक्क लागू करण्यात आलेले आहेत. त्यामुळे कुणाचाही गरिबीमुळे मृत्यू होऊ नये, सर्वांना समान हक्क मिळावा, असेही वेणुगोपाल म्हणाले.

५ वर्षांपूर्वी ते आपल्या कंपनीतून निवृत्त झाले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरीत झालेले वेणुगोपाल यांनी त्यांच्यासारखी वेषभुषा करुन अनेक कार्यक्रमात हजेरी लावायला सुरुवात केली. प्रत्येक कार्यक्रमात लोकांकडून या उपक्रमाचे कौतूक होत असल्याने आजवर त्यांनी हे काम सुरु ठेवले आहे. एखाद्या कार्यक्रमाची माहिती मिळताच वेणुगोपाल त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी धडपडत असतात. चैत्यभुमीवर दाखल झालेल्या भीमअनुयायांनी त्यांच्यासोबत फोटो, सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली होती. लोकांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे हे काम अखंडपणे भविष्यात सुरु ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

समता सैनिक दलाकडून समतेचा संदेश
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्राच्या तळागाळातून प्रचंड मोठा भीमसागर दादरच्या चैैत्यभुमीत लोटला होता. दादरच्या या गर्दीतसुद्धा समता सैनिक दलाच्या तरुणांनी पोस्टरच्या माध्यमातून दिलेला अनोखा संदेश सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता. वेगवेगळ्या समाजाच्या मागास जातीविषयी हे पोस्टर लावण्यात आले होते. या पोस्टरमध्ये तृतीयपंथी, न्हावी, कुंभार अशा विविध जातींचा उल्लेख करून केवळ संविधानामुळेच आम्ही शिक्षण घेऊ शकलो आणि अधिकारी बनलो, असे म्हणत डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले. संविधान सगळ्यांसाठी एक असून त्यामध्ये भेदभाव न करता सगळ्यांना समान हक्क मिळावा असा संदेश या पोस्टर्सच्या माध्यामातून देण्यात आला आहे.

फेसबूक ग्रुपच्या तरुणांची अनोखी चळवळ
तीन वर्षांपूर्वी फेसबुकवर आंबेडकरवादी तरुणांनी स्थापन केलेल्या फॅम नावाच्या ग्रुपच्या माध्यमातून डॉ. आंबेडकर यांना चैत्यभूमीवर अनोख्या पद्धतीने अभिवादन केले. डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीत दाखल झालेल्या अनुयायांकडून एक वही आणि एक पेन या ग्रुपच्या माध्यमातून जमा करण्यात आली. जमा झालेल्या वह्या आणि पेन महाराष्ट्रातील अनेक गरजू मुलांना भवितव्य घडवण्यासाठी उपयोगी पडतील, या जाणीवेतून हा संकल्प करण्यात आला असून त्यासाठी जवळपास एक लाख तरुणांनी आतापर्यंत मेहनत घेतली आहे. सोबत आपले मतदान अमूल्य आहे ते वाया घालवू नका, त्याचे महत्व समजून घ्या, असा संदेशसुद्धा या समुहाकडून देण्यात आला आहे.

First Published on: December 7, 2018 5:15 AM
Exit mobile version