ऐन मतदानाच्या दिवशीच मुंबईकरांचा पाणीपुरवठा बंद

ऐन मतदानाच्या दिवशीच मुंबईकरांचा पाणीपुरवठा बंद

मुंबईकरांना पाणी पुरवठा करणार्‍या महापालिकेच्या कर्मचार्‍यांनाच निवडणूक कामांसाठी जुंपण्यात आले आहे. पाणी खाते हे अत्यावश्यक सेवेत मोडत असून चावी फिरवणार्‍या आणि पंप चालवणार्‍या कामगारांना निवडणूक कामासाठी निवड करण्यात येवू नये, असे स्पष्ट संकेत असतानाही निवडणूक आयोगाने या कामगारांना ड्युटी लावली आहे. त्यामुळे मुंबईकरांना मतदानाच्या दिवशीच पाणी मिळणार नाही.

२८ व २९ एप्रिलला पाणी नाही 

मुंबई महापालिकेच्या एफ-उत्तर विभागातील मॅकेनिकल इंजिअरींग विभागामार्फत जे कर्मचारी पाण्याचे पंप चालू करतात, तसेच चावी फिरवतात, अशा कामगारांना लोकसभा निवडणूक कामांसाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे रविवार २८ तसेच सोमवारी २९ एप्रिल रोजी पाणी पुरवठा उपलब्ध होणार नाही, असे एफ-उत्तर विभागाने जाहीर केले आहे. आजवर निवडणूक कामांसाठी विभाग कार्यालयातील पाणी खात्यातील पंप चालवणारे व चावी फिरवणार्‍या कामगारांची निवडणूक कामांसाठी निवड करण्यात येत नव्हती. परंतु पाणी खाते हे अत्यावश्यक सेवेत मोडूनही निवडणूक आयोगाने काढलेल्या निवडणूक ड्युटीबाबत विभाग कार्यालयाच्या अधिकार्‍यांनी कोणताही आक्षेप नोंदवला नाही. परिणामी या शीव, वडाळा व अँटॉप हिल भागात मतदानाच्या आदल्या दिवशी आणि मतदानाच्या दिवशी पाणी पुरवठा होणार नसल्याची कल्पना विभागाचे सहायक आयुक्तांनी दिली आहे.

महापालिका आयुक्तांना पत्र

एफ-उत्तर विभागातील जलअभियंता विभागाच्या कामगारांची निवडणूक कामांसाठी निवड झाल्याने पाणी पुरवठ्यावर होणार्‍या परिणामाबाबत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी तातडीने महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना पत्र लिहून आपल्या विभागामध्ये मतदानाच्या दिवशी पाणी पुरवठा चालू ठेवण्याची सूचना केली आहे. दोन दिवस पाणी पुरवठा बंद केल्यामुळे आपल्या विभागातील स्थानिक नागरिकांना खूपच त्रास व गैरसोय सहन करावी लागणार आहे,असे त्यांनी म्हटले आहे. आपल्या के.डी. गायकवाड नगर, महापालिका वसाहतीसह तसेच मुंबईतील सर्व विभागात पाणी पुरवठा चालू ठेवण्याबाबत संबंधितांना योग्य त्या कार्यवाहीचे आदेश देण्यात यावेत,अशीही मागणी केली आहे.

First Published on: April 24, 2019 9:48 PM
Exit mobile version