महागड्या स्वप्नात मरण झाले स्वस्त…

महागड्या स्वप्नात मरण झाले स्वस्त…

महापुर

 बदलापूरने घ्यावा पूरातून बोध !
गेल्या २७ जुलैला व त्यानंतर आठड्याभरातच म्हणजे ४ ऑगस्टला झालेल्या पुराने बदलापूरकरांच्या मनात २६ जुलै २००५ च्या कटू आठवणी जाग्या झाल्या. सुदैवाने या दोन्ही वेळा पावसाने थोडीशी उसंत घेतल्याने पुराचे पाणी कमी होऊन २६ जुलैची पुनरावृत्ती टळली. मात्र या पुरानेही अनेकांचे अतोनात नुकसान झाले असून यातून सावरत पूर्वपदावर यायचे कसे? असा प्रश्न अनेक कुटुंबाना पडला आहे. मुसळधार पाऊस झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे कारण सांगत अनेकजण पावसाकडे बोट दाखवून मोकळे होत आहेत. परंतु २६ जुलै २००५च्या महापुराचा मोठा फटका बसूनही त्यापासून कोणताही बोध न घेतल्यानेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे, हे कटू सत्य नाकारून चालणार नाही.

बदलापूर आणि पूर हे नवीन नाही. सन २००५ पूर्वीपासून दरवर्षी पावसाळ्यात जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात बदलापुरात एकदा पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होत होती. शहरातील कात्रप, हेंद्रेपाडा, रमेशवाडी, मांजरली व इतर सखल भाग जलमय होत होते. मात्र २६ जुलै २००५ रोजी आलेला महापूर हा त्यामानाने खूपच मोठा होता. या पुरात झालेल्या हानीचा विचार करता त्यावेळी गावपण जपत विकसित शहराच्या दिशेने वाटचाल करणार्‍या बदलापूरला हा मोठा फटका होता. त्यामुळे बदलापूर शहर जवळपास दहा वर्ष मागे गेले. मात्र त्यानंतर आतापर्यंत शहरात अशी पूरपरिस्थिती निर्माण न झाल्याने कालांतराने सर्वांनाच याचा विसर पडला. पूरपरिस्थिती एक नैसर्गिक आपत्ती होती, असा विचार करून पुन्हा बदलापूरच्या विकासाने भरारी घेतली.

पुन्हा बदलापूरला वास्तव्यासाठी येणार्‍या मुंबईकर चाकरमान्यांची संख्या वाढू लागली. आणि अल्पावधीतच बदलापूरच्या बांधकाम व्यवसायाला तेजी आली. ती आजतागायत कायम आहे. त्यामुळे पूर्वी ज्या बदलापुरात पाहिलं तर सगळीकडे हिरवेगार दिसायचे ते बदलापूर आता सिमेंटचे जंगल भासू लागले आहे. शहराचा झपाट्याने होत असलेला विकास त्याअनुषंगाने होत असलेली विकासकामे हे चित्र समाधानकारक होते. मात्र त्याच समाधानकारक भासणार्‍या आरशाच्या दुसर्‍या बाजूला मात्र शहरासाठी धोक्याची घंटाही वाजत होती. त्याकडे नागरिक, लोकप्रतिनिधी, प्रशासन कुणीही गांभीर्याने पाहिले नाही.

२६ जुलै २००५ च्या प्रलयंकारी पुरामुळे निसर्गाने बदलापूरकरांना पहिला इशारा दिला होता. बदलापुरात गेल्या दोन अडीच दशकांत मोठ्या प्रमाणात इमारती बांधकामे झाले. अनेक नामवंत बांधकाम व्यावसायिकांनी चांगल्या दर्जाच्या इमारती, गृहसंकुले उभारून बदलापूरच्या विकासात योगदान दिले. त्यामुळे मोठ्या संख्येने मुंबई, ठाणे यांसारख्या शहरांतील चाकरमान्यांनी, मध्यमवर्गीयांनी व अगदी सर्वसामान्यांनीही बदलापूरला पसंती दिल्याने बदलापूरच्या विकासाचा वेग वाढला. काही बांधकाम व्यावसायिकांनी मात्र शहर नियोजनातील पूरनियंत्रण रेषा, नैसर्गिक नाले असे अनेक नियम धाब्यावर बसवून वा त्यातील पळवाटांचा फायदा घेऊन मनमानी पद्धतीने बांधकामे केली. मोठ्या प्रमाणात चाळींची बांधकामेही झाली. यासंदर्भात नगर परिषद प्रशासनाकडून संबंधितांवर वेळीच कारवाई झाली असती. तर कदाचित ही परिस्थिती निर्माण झाली नसती. या पुरापासून बोध घेऊन नदी पात्रालगतच्या भागातील इमारतींना परवानग्या देताना खाली स्टील्ट कम्पलसरी करण्याची गरज होती.

या भागात पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही यादृष्टीने नैसर्गिक नाल्यांचे सर्वेक्षण करून ते बुजवले जाणार नाहीत वा छोटे केले जाणार नाहीत, याची दक्षता घेण्याची गरजेची होती. त्याकडे गांभीर्याने न पहिले गेल्याने पुन्हा बदलापूरला पुराचा तडाखा बसला. त्यामुळे आता तरी जागे होऊन अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रभावी उपाययोजना करणे क्रमप्राप्त झाले आहे. अर्थात यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनीही एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. परंतु आतापर्यंतचा अनुभव पाहता नैसर्गिक आपत्तीची काही काळ चर्चा होत राहते, नंतर मात्र त्याचा विसर पडतो. याचाच फायदा घेऊन शहर नियोजनाचे नियम धाब्यावर बसवत पुन्हा नैसर्गिक आपत्तीला आमंत्रण दिले जाते. निसर्ग काही काळ सहन करतो पण असह्य झाले की सार काही उद्ध्वस्त करून आपला मार्ग मोकळा करतो. याचा प्रत्यय पुन्हा एकदा बदलापुरातील पुराने दिला आहे. २६ जुलै २००५ च्या महापुरातून बोध घेतला असता तर कदाचित ही परिस्थिती निर्माण झाली नसती. त्यामुळे आता निदान २०१९ च्या पुरापासून तरी बदलापूर बोध घेणार का ? हाच खरा सवाल आहे.

नागरिकांची त्रेधातिरपीट …
भिवंडी शहर आणि ग्रामीण पट्ट्यात सलग ७२ तासांहून अधिक काळ मुसळधार पाऊस कोसळल्याने दुकानात, कारखान्यात, घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने सर्वत्र हाहाकार उडाला होता. त्यामुळे भिवंडीकरांना पुन्हा एकदा २६ जुलै २००५ च्या पुराची आठवण झाली. शहरातील शिवाजी चौक या परिसरात तब्बल पाच फुटांहून अधिक पाणी आल्याने येथील सर्व दुकाने व घरांमध्ये पाणी शिरले आहे तर तिनबत्ती, ईदगाह रोड, बाजारपेठ, नवी चाळ, म्हाडा कॉलनी, बंदर मोहल्ला, अंबिका नगर यांसह माणकोली, रांजणोली, पडघा, भादाणे, कांबे, सोनाळे, कोनगाव, खडकपाडा, पिंपळास, वेहळे, अलिमघर आदी गावांमध्ये सुध्दा मोठ्या प्रमाणावर घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली होती.
शहरातील नाल्यांमार्गे पाण्याचा निचरा खाडीत होतो, महानगरपालिका नालेसफाई कागदावर दाखवत असल्याने शहरातील कचरा नाल्यात तसाच साचत आहे, त्यामध्ये भाजीपाला, मच्छी-मटणाची घाण, तर यंत्रमाग कारखान्यातून निघणार धागा, लोचनचा कचरा नाल्यात टाकण्यात येत आहे. त्यामुळे हा परिसर मोठ्या प्रमाणात जलमय होतो, मात्र याकडे महानगरपालिका प्रशासनाने, लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

भिवंडीत मुसळधार पावसाने महाभयंकर पुरपरिस्थिती निर्माण केली असता शहरासह तालुक्यातील नदीनाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे या नदीनाल्या लगतच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने असंख्य कुटुंबांचे संसार उघड्यावर आले आहेत. एनडीआरएफ जवानांच्या मदतीने भातसा नदीकिनारी वसलेल्या कळंबेवाडी, सोर, आवाली, वांद्रे, ओझली, आतकोली, भादाणे, अर्जुनली, चिराडपाडा, पिसे, कोंडेरी, सागोडे, नटघर, किरवली, सांगे, देवरुंग, बापगांव, नांदकर आदी १७ गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने येथील २ हजार नागरिकांना सुरक्षितपणे अन्य ठिकाणी हलवण्यात आले. मात्र महत्वाची बाब म्हणजे या भातसा नदीच्या पत्रामध्ये अतिक्रमण करण्यात आल्याने प्रवाहात बदल होऊन लगतच्या गावात पाणी शिरत आहे अशीच स्थिती कामवारी, तानसा नदीचीही अशीच अवस्था आहे.

त्यामुळे नदीपात्रात अतिक्रमण करणार्‍यांच्या विरोधात प्रशासनाने कडक कारवाई केल्यास नदीकिनारील गावांना धोका टळू शकतो त्याच प्रमाणे खाडी किनारील कांदळवन नष्ट करून विकासक अतिक्रमण करून गोदामे, इमारती बांधत असल्याने खाडीलगत असलेल्या डुंगे, वडघर, वडूनवघर, खारबांव, जुनांदुर्खी, टेंभवली, कोनगांव, पिंपळास, मालोडी, खार्डी, पाये, पायगांव, केवणीदिवे, अंजुर, अलीमघर, वेहळे, भरोडी आदी गावातील भातशेती पाण्याखाली गेल्याने भातपीके कुजून गेले असून शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. भिवंडीतील पूरस्थितीमुळे शेतीच्या झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे येथील शेतकरी शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत असून राज्य शासन या शेतकर्‍यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देईल का? याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र प्रशासनाने वेळीच कांदळवन वाचवून अतिक्रमण करणार्‍या विकासकांवर कडक कारवाई केल्यास भविष्यात पुराचा धोका गावांना होणार नाही …

उल्हानगरात नदी नाले बुजवून अनधिकृत बांधकामे
उल्हानगर शहरालाही महापुराने गाठले. सुमारे 2 हजार कुटुंबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुर परिस्थिती हाताळण्याबाबत कोणतेही उपाययोजना अंमलात न आणल्याने त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. नदी पात्र, नाले, गटारी यांच्यावर भराव टाकून किंवा त्यांचा मार्ग रोखून मोठ्या प्रमाणात झालेली अनधिकृत बांधकामे हीच महापुराला कारणीभूत ठरली आहेत. 14 वर्षापूर्वीच्या पुराची पुनरावृत्ती यंदाच्या वर्षी झाली. मात्र २६ जुलै 2005 च्या महापुरातून उल्हासनगरने कोणताच धडा घेतला नसल्याचे दिसून आले.

उल्हासनगर शहरातून जाणार्‍या वालधुनी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात भराव टाकून अतिक्रमण केले जात आहे. पूर नियंत्रण रेषेच्या आत अनेक ठिकाणी झोपडपट्टी, भंगार माफियांची गोडाऊन दुकाने यामुळे नदीपात्र अरुंद झालेला आहे. 26 जुलै 2005 झालेल्या भीषण पुरानंतर त्याचा कोणताही बोध महानगरपालिका प्रशासन, तहसीलदार कार्यालय, प्रांत कार्यालय या सरकारी यंत्रणांनी घेतलेला नाही. नदी पात्रातील अतिक्रमणे काढून टाकण्याऐवजी येथे अतिक्रमणे वाढत गेली त्यामुळे वालधुनी नदी पात्राजवळ असलेल्या सम्राट अशोक नगर, हिराघाट, संजय गांधी नगर, सी एच एम कॉलेज परिसर, शांतीनगर, मीनाताई ठाकरे नगर आदी परिसर पुराच्या तडाख्यामुळे बाधित झाले. एवढेच नव्हे तर दुसरीकडे मुख्य नाला असलेल्या खेमानी नाल्याच्या पात्रात देखील अतिक्रमण झाल्याने पुराचा फटका, फर्निचर मार्केट, गजानन मार्केट, गोल मैदान, प्रबुद्ध नगर, सी ब्लॉक या परिसरातील नागरिकांना बसला आहे. मुंबईच्या मिठी नदीच्या धर्तीवर अंबरनाथ, उल्हासनगर शहरातून जाणार्‍या वालधुनी नदीचा विकास करण्यात यावा अशी मागणी अनेक स्वयंसेवी संघटनांनी केली आहे. या बाबतचा विकास आराखडा देखील शासनाकडे सादर करण्यात आला आहे , मात्र मनपा प्रशासन आणि स्थानिक आमदार यांनी पाठपुरावा करण्याबाबत उदासीनता दाखवल्यामुळे हा प्रकल्प रखडला गेला आहे .

महापुराचा हाहाकार…प्रशासनाची हतबलता !
ठाणे, रायगड आणि पालघर या तिन्ही जिल्ह्यात महापुराने हाहाकार माजविला. शेकडो नागरिकांना जलसमाधी मिळाली तर हजारो नागरिकांचे संसार पाण्यात वाहून गेले. एकीकडे शासन – प्रशासन स्मार्ट सिटीचे स्वप्न रंगवत आहे. मात्र दुसरीकडे आपत्कालीन परिस्थितीत तोंड देण्यासाठी प्रशासनाची हतबलता दिसून आली आहे. त्यामुळे या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. आपण केलेल्या चुकाच आपल्याला मारक ठरल्या आहेत. यातून आपण काही धडा घेणार आहोत की नाही? असाच सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह आजूबाजूच्या सर्वच शहरांना महापुराचा फटका सहन करावा लागला. जिल्ह्यातील बारवी आणि भातसा हे धरण ओव्हरफ्लो झाल्याने उल्हास, काळू, बारवी या नद्यांना महापूर आला. त्यामुळे शहरात कमरे एवढे पाणी साचले. बैठ्या चाळीपासून ते हाय प्रोफाइल पालावा सिटी पाण्याखाली गेली. ग्रामीण भागातील पूल पाण्याखाली गेल्याने शेकडो गावांचा संपर्क तुटला होता. रेल्वे, रस्ते पाण्याखाली गेल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यामुळे एनडीआरएफ, हवाई दलाची मदत घ्यावी लागली. मात्र तोपर्यंत सामान्य लोकच एकमेकांचा आधार बनली होती. आपत्कालीन परिस्थितीला तोंड देऊ शकेल अशी यंत्रणेची तत्परता दिसून आली नाही.

ठाणे, कल्याण-डोंबिवली या परिसराला खाडीकिनारा लाभला आहे मात्र खाडी किनारी असलेल्या खारफुटीची कत्तल मोठ्या प्रमाणात करून त्या ठिकाणी अनधिकृत चाळी उभारण्यात आल्या आहेत. पुराचा सर्वाधिक फटका त्यांना बसला असून, त्यात हजारो कुटूंब बाधित झाली. खाडी बुजविण्याचे महापाप हळूहळू सुरू आहे. वालधुनी नदीचे नाल्यात रूपांतर झाले आहे. शहरातील मोठ्या नाल्यांची रूंदी कमी कमी होत गेली आहे हीच करणे कारणीभूत ठरली आहेत. भरतीच्या वेळी हीच खारफुटी पाण्याला अटकाव करीत असते. त्यामुळे खाडीकिनारी खारफुटीच्या झाडाची लागवड महत्वाची आहे. खाडी किनारी उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर आळा बसला पाहिजे. शहराच्या विकासात अरुंद झालेले नाले रुंद झाले पाहिजे आदी कडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा स्मार्ट सिटीचे स्वप्न रंगवून काहीच उपयोग होणार नाही.

शहापूराला महापुराचा वेढा ….
सलग ७२ तास पाऊस कोसल्याने भातसा, तानसा या नद्यांनी रौद्र रुप धारण केले होते. नद्यांंनी धोक्याची पातळी ओलांडली, नदी किनारी वसलेली गाव शहरं जलमय झाली. पुराच्या वेढयात अडकलेली गावं आणि तेथील माणसांचा जीव वाचविण्यासाठी सुरु असलेली धडपड अक्रोश बघायला मिळाला, भातसा नदी किनार्‍यालगत शहापूर तालुक्यातील सापगाव, वासिंद, भातसई, खडावली यांसह शेकडो गाव पाडयांत भातसा नदीच्या पुराने अक्षरशः थैमान घातले होते. पुराच्या कचाट्यात गावे सापडली. पुल पाण्याखाली गेले, रस्ते खचले, वाटा पाण्यात हरविल्या, घर कोसळली, डोळ्यासमोर दिसणारी भातशेती पुराच्या पाण्याने उद्ध्वस्त झाली, लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सैन्यदलाला पाचारण करण्यात आले. मदतीसाठी स्थानिक तरुणही पाण्यात उतरले होते. भातसा नदीकिनारी वसलेल्या १७ गावांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. एनडीआरएफ जवानांच्या मदतीने येथील २ हजार नागरिकांना सुरक्षितपणे अन्य ठिकाणी हलवण्यात आले. हा थरार अनेकांनी अनुभवला खडावली जवळील जू गावाची होती. या गावाला तर भातसा नदीच्या पाण्याने चारही बाजूने वेढले होते. यावेळी गावामधील नागरिकांचे प्राण धोक्यात आले होते. एअरफोर्सच्या मदतीने याठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले.

नदीचा प्रवाहात बेकायदा बांधकाम…
भातसा नदीचा नैसर्गिक प्रवाह अडवून तेथे भराव टाकण्यात आला आहे. नदीकिनारी मोठ्या प्रमाणावर चाळी इमारतींचे बांधकाम झाले आहे. त्यामुळे पावसाळ्यात धरण ओव्हरफ्लो झाल्यावर नदीच्या पाण्याची पातळी वाढते व यावेळी पुरपरिस्थिती निर्माण होते. नदीचे नैसर्गिक प्रवाह मोकळे करणे आता गरजेचे आहेत त्यासाठी नदी किनार्‍यावर असलेली अनधिकृत बांधकामे जमिनदोस्त करणे हाच यावर उपाय आहे. पण सरकारी इच्छाशक्ती असणे महत्वाचे आहे. त्यामुळे नदीचे प्रवाह मोकळे होतील का? हा संशोधनाचा भाग ठरेल..

संकलन – संतोष गायकवाड, रविंद्र शिंदे, अविनाश उबाळे, संजय राजगुरु

First Published on: August 12, 2019 5:57 AM
Exit mobile version