महापुरातील नागरिकांच्या आयुष्यात पुन्हा आनंद आणू – मुख्यमंत्री

महापुरातील नागरिकांच्या आयुष्यात पुन्हा आनंद आणू – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पश्चिम महाराष्ट्रात महापुरामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली. अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. जनावर, गुरे-ढोरे पुरात वाहून गेले. अनेक जण बेघर झाले. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठिमागे उभा राहिला त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे आभार मानले. याशिवाय ७३ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महापुरातील नागरिकांच्या आयुष्यात पुन्हा आनंद आणू, असे आश्वासन दिले आहे. देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जात आहे. यावेळी राज्याचे पहिले नागरिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात ध्वजारोहन करत नागरिकांना संबोधित केले.

नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भारतीय संसदेचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो. आज खरं म्हणजे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली. गेल्या दहा-पंधरा दिवसांमध्ये राज्य सरकार, स्वयंसेवी संस्था, भारतीय सैन्य दल, नौदल, वायूसेना, तटरक्षक दल, एनडीआरएफ या सर्वांनी प्रचंड मेहनत आणि अहोरात्र परिश्रम करुन पुरामध्ये अडकलेल्यांना बाहेर काढले. महापुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. पुरग्रस्त नागरिकांच्या मागे आपल्याला खंबीरपणे उभे राहायचे आहे. महाराष्ट्र सरकारने ६८०० कोटी रुपयांचा निधी देऊन पूनर्वसनाचे काम हाती घेतले आहे. हे काम लवकरात लवकर व्हावं हा प्रयत्न सुरु आहे. मी महाराष्ट्राला विश्वास देतो की महापुरामुळे आमच्या ज्या नागरिकांना जो त्रास सहन करावा लागला आहे त्यांचे पूनर्वसन करु. या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने महापुरातील नागरिकांच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंद आणू. या भीषण परिस्थितीत संपूर्ण महाराष्ट्र आमच्या पाठिशी राहिला. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा मी आभारी आहे.’

‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न आम्ही पूर्ण केले’

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मागील पाच वर्षांमध्ये या सरकारने सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल करण्याचा प्रयत्न केला. जवळपास ५० हजार कोटी रुपये विविध योजनांच्या माध्यातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिली. पण त्याचवेळी जलयुक्त शिवार सारख्या योजनेतून सरकारने महाराष्ट्राला जल परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला. गेल्या तीन वर्षात दुष्काळाचे मोठे संकट महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी वाहून जाणारे पाणी साठवून दुष्काळी भागात नेण्याचे काम महाराष्ट्र सरकार करत आहे. महाराष्ट्रातील अर्धव्यवस्था ही देशातील सर्वात भक्कम अर्थव्यवस्था आहे. महाराष्ट्रात उद्योगधंदे सर्वात अव्वल आहे. महाराष्ट्राने सर्वात जास्त औद्योगिक गुंतवणूक आणली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम आम्ही केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशिर्वाद लाभल्यानंतर त्यांनी राज्य कारभाराचे जे सुत्र दिले त्या सुत्राच्या रुपात आपण आज या ठिकाणी कार्य करत असताना पंतप्रधान मोदींनी सबका साथ, सबका विश्वास आणि सबाका विकास ही त्रिसुत्री दिलेली आहे. याच्या आधारावरच आपण पुढची वाटचाल आपण करु.’ समाजाच्या सर्व घटकांना एकत्र घेऊन हे राज्य सरकार पुढे चालले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.


हेही वाचा – Live: चीफ ऑफ डिफेन्समुळे संरक्षण सामर्थ्यात वाढ होणार – मोदी

First Published on: August 15, 2019 10:34 AM
Exit mobile version