उड्डाणपुलांची कामे कधी संपणार ?

उड्डाणपुलांची कामे कधी संपणार ?

Flyover

ठाण्यातील उड्डाणपुलांची कामे सुरू असल्यामुळे शहरात गर्दीच्यावेळी वाहतुकीचा वेग मंदावला होता, पण शहरातील उड्डाणपूल कार्यरत झाल्यावर वाहतुकीचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर यांनी पुलांच्या कामांची पाहणी केल्यानंतर सर्व कामे 10 दिवसांत पूर्ण करण्यास सांगितले आहे, तसेच एमएमआरडीएने संबंधित कंत्राटदारांना पुलांचे काम 25 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यास सांगितले आहे.

ठाण्यातील अल्मेडा चौकातील उड्डाणपूल काही महिन्यांपूर्वीच सुरू झाला आहे. आता नौपाड्याचा उड्डाणपूल आणि मीनाताई ठाकरे चौकातील उड्डाणपूल सुरू झाल्यावर ठाणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीतून ठाणेकरांची सुटका होणार आहे.

शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एमएमआरडीएच्या सहकार्याने मखमली तलाव ते वंदना सिनेमा, नौपाडा पोलीस ठाणे ते भास्कर कॉलनी आणि मीनाताई ठाकरे चौक या तीन ठिकाणी उड्डाणपूल तयार करण्याचा निर्णय ठामपाने घेतला होता. मागील वर्षी 2 मे रोजी ठाणे महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त सुनील चव्हाण यांनी पुलाच्या कामाची गती वाढविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावेळी ही कामे लवकरात लवकर संपवून 10 मेपर्यंत हे पूल वाहतुकीसाठी खुले करण्याचे आदेश त्यांनी संबंधित अभियंत्यांना दिले होते. मात्र, अद्याप आठ महिन्यांचा कालावधी उलटूनही हे काम अद्याप झालेले नाही.

या उड्डाणपुलांकरता एमएमआरडीएने 223 कोटी रुपये मोजले आहेत, तर सुमारे चार कोटी 37 लाख रुपयांचा वाढीव खर्च ठामपाने केला आहे. यापैकी सद्यःस्थितीत वंदना जवळील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असला तरी वाहतूक कोंडीचा प्रश्न अद्यापही जैसे थेच आहे. आता हे दोन पूल वाहतुकीसाठी लवकरच खुले करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले असले तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केव्हा होते याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.

गेले वर्षभरापासून या पुलांच्या कामाची गती पाहिली तर या 10 दिवसांत ते पूर्ण होतील यात शंका वाटते. दिलेल्या मुदतीत ही कामे का पूर्ण होत नाहीत याबाबत मात्र मौन बाळगले जाते.
-देवेंद्र वाईरकर, सामाजिक कार्यकर्ते

शहरातील या उड्डाणपुलाच्या संबंधातील सर्व माहिती मी माहिती जनसंपर्क विभागाकडे दिली असून, त्यांच्याकडूनच ती घ्यावी.
– राजन खांडपेकर, उपअभियंता, ठाणे महानगरपालिका

First Published on: February 16, 2019 5:08 AM
Exit mobile version