अनुदानित माध्यमिक शिक्षक बोनसविना; मुंबई महापालिकेने शिक्षकांच्या तोंडाला पाने पुसली

अनुदानित माध्यमिक शिक्षक बोनसविना; मुंबई महापालिकेने शिक्षकांच्या तोंडाला पाने पुसली

मुंबई महापालिकेकडून सोमवारी पालिका कर्मचार्‍यांना सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले. परंतु यामध्ये पालिकेकडून माध्यमिक शाळेत शिक्षकांना वगळण्यात आल्याने शिक्षकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. अनुदानित खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना सानुग्रह अनुदान जाहीर केले. मात्र माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सानुग्रह अनुदानापासून वंचित ठेवत त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.

मुंबई महापालिकेच्या स्वत:च्या १९० माध्यमिक शाळा आहेत. यावर्षी महापालिकेकडून सानुग्रह अनुदान जाहीर करत कर्मचार्‍यांना दिलासा दिला. त्यातही शिक्षकांना सापत्न वागणूक देण्यात आली आहे. पालिका कर्मचार्‍यांना जाहीर केलेल्या सानुग्रह अनुदानापेक्षा निम्मे सानुग्रह अनुदान हे अनुदानित प्राथमिक शाळांना देण्यात आले आहे. मुंबई महापालिका इतर कर्मचार्‍यांना दरवर्षी सानुग्रह अनुदान देते. मात्र शिक्षकांना नेहमीच सापत्न वागणूक दिली जाते. यावर्षीही खासगी प्राथमिक अनुदानित शिक्षकांना निम्मे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. तर शिक्षण सेवक यांना इतर कर्मचार्‍यांच्या तुलनेत पावच सानुग्रह अनुदान दिले आहे. माध्यमिक शिक्षकांना मात्र सानुग्रह अनुदानच जाहीर केले नाही.

शिक्षकही मनपाचेच कर्मचारी आहेत. त्यांना मात्र महापालिका सानुग्रह अनुदान देत नाही. महापालिकेच्या इतर कर्मचार्‍यांप्रमाणे पालिकेच्या सर्वच शाळेतील शिक्षकांना सारखाच बोनस जाहीर करावा. शिक्षक कोरोना योद्धे आहेत. यावर्षी मुंबई मनपा माध्यमिक शिक्षकांनी इयत्ता १० वी चा सर्वात जास्त निकाल लावला. कोरोनामध्येही काम केले, तरीही सापत्न वागणूक देण्यात येत असल्याची भावना शिक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. शिक्षक परिषदेच्या वतीने मुंबई महानगरपालिकेकडे सर्वच शिक्षकांना समान सानुग्रह अनुदान देण्याची मागणी शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली.

First Published on: November 2, 2020 7:05 PM
Exit mobile version