जुनादुर्खीतील रहिवाशांच्या घशाला कोरड

जुनादुर्खीतील रहिवाशांच्या घशाला कोरड

Bhiwandi

भिवंडी तालुक्यातील जुनादुर्खी येथील असंख्य महिला मागील तीन महिन्यात पासून पाणी अनियमित येत आहे. गावाच्या परिसरात बोअरवेल खोदल्यास त्यामधून खारट पाणी मिळत असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी दुसरी कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्याने या महिलांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. या परिसरातील महिलांनी गावच्या सरपंच शेवंती रमेश गडग व उपसरपंच सुनीता योगेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी पंचायत समिती कार्यालय गाठून तेथील अधिकार्‍यांना जाब विचारण्यासाठी कार्यालयात ठिय्या देण्याचा निर्णय घेतला. परंतु तालुक्याची आमसभा असल्याकारणाने पंचायत समिती गटविकास अधिकारी व इतर अधिकारी हे दुगाडफाटा या ठिकाणी निघून गेल्याने त्यांची भेट न झाल्याने महिलांनी संताप व्यक्त केला आहे.

भिवंडी तालुक्यातील जुनादुर्खी या गावात नळपाणीपुरवठा योजना असून त्यासाठी स्टेम प्राधिकरणाच्या खारबाव रस्त्यावरील पाईपलाईन मधून जोडणी दिली असून तेथून गावापर्यंतचे अंतर तीन किलोमीटर असून दरम्यान अनधिकृत नळजोडणी केल्या गेल्याने जुनादुर्खी गावापर्यंत पाणी पोहचत नसल्याची माहिती आहे. परंतु अशा परिस्थितीतही जुनादुर्खी ग्रामपंचायतीस दरमहा पाणीबिलाची रक्कम वाढत जाऊन तब्बल 30 लाख रुपयाने पाणी बिल ग्रामपंचायती कडून थकले आहे. अशा परिस्थितीत गावातील कुटुंबियांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने नागरिक हवालदिल झाले असल्याची माहिती सरपंच शेवंती गडग यांनी दिली. तर उपसरपंच सुनीता पाटील यांनी ज्या स्टेम प्राधिकरण कडून गावासाठी पाणी मिळते त्या पाइपलाइनचे अंतर सुमारे तीन किलोमीटर असून त्याठिकाणी असंख्य अनधिकृत नळ कनेक्शन घेतले गेल्याने गावासाठी पाणी उपलब्ध होत नसल्याचे सांगत त्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी स्टेम प्राधिकरणाची असल्याचे सांगितले.

First Published on: January 29, 2019 5:06 AM
Exit mobile version