अकरावीच्या जागांचा सरकारकडून ‘सेल’

अकरावीच्या जागांचा सरकारकडून ‘सेल’

प्रातिनिधिक छायाचित्र

ज्युनिअर कॉलेजांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात अकरावीच्या जागा रिक्त राहतात. सध्याच्या प्रवेश प्रक्रियेमध्येही हीच परिस्थिती आहे. असे असताना सरकारने 2019-20 शैक्षणिक वर्षासाठी मुंबई महानगर प्रदेशामध्ये तब्बल 30 कॉलेजांना अतिरिक्त तुकड्या सुरू करण्याची परवानगी दिली आहे. 30 तुकड्या म्हणजेच अंदाजे 1800 नवीन जागा निर्माण केल्या आहेत. त्यापूर्वी दहावीचा निकाल घसरल्याने नामांकित कॉलेजमध्ये 5 ते 8 टक्के जागा वाढवल्या होत्या. त्यामुळे सरकारकडून अकरावीच्या जागांचा मुंबईमध्ये ‘सेल’ लावल्याचे दिसून येते.

2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण विभागाने स्वयं अर्थसाहाय्यता तत्त्वावर अकरावी प्रवेशासाठी राज्यातून तब्बल 63 कॉलेजांना नवीन तुकड्या सुरू करण्याची मान्यता शासन निर्णय काढून दिली आहे. यामध्ये मुंबई विभागात तब्बल 30 कॉलेजांचा समावेश आहे. या कॉलेजांना नवीन तुकडी सुरू करण्याची परवानगी देताना आवश्यक सोईसुविधा, कर्मचारी वर्ग, पटसंख्येप्रमाणे उपलब्ध विद्यार्थी आहेत का, याची खातरजमा शिक्षणाधिकार्‍यांनी करणे बंधनकारक असल्याचे शासन निर्णयामध्ये म्हटले आहे.

विल्सन कॉलेज, अंधेरी येथील भवन्स कॉलेज, भांडुपमधील दिशा कॉलेज, दहिसरमधील ठाकूर कॉलेज या कॉलेजांमध्ये अतिरिक्त तुकड्या वाढवून देण्यात आल्या आहेत. वाढवण्यात आलेल्या तुकड्यांमध्ये कॉमर्सच्या तुकड्या अधिक आहेत.

जागा रिक्त राहण्याची शक्यता

यावर्षी दहावीचा निकाल कमालीचा घसरल्याने शिक्षण विभागाने मुंबईतील नामांकित कॉलेजमध्ये 5 ते 8 टक्के जागा वाढवून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे यावर्षीच्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 2018 मध्ये 70 हजारापेक्षा अधिक जागा मुंबई विभागातून रिक्त राहिल्या होत्या. गतवर्षी अकरावी प्रवेशासाठी 2.31 लाख अर्ज आले होते तर यावर्षी 2.11 अर्ज आले आहेत. त्यातच दहावीचा निकाल घसरल्याने मुंबई विभागात नामांकित कॉलेजांमध्ये 5 ते 8 जागा वाढवण्याबरोबरच 30 नव्या तुकड्यांना मान्यता दिल्याने मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.

First Published on: August 14, 2019 4:55 AM
Exit mobile version