हॉस्पिटल, महिला व बालभवनासाठी भूखंड देण्यास सिडकोची तयारी

हॉस्पिटल, महिला व बालभवनासाठी भूखंड देण्यास सिडकोची तयारी

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज, बालभवन, महिला भवन, शूटिंग रेंज आणि कुस्तीचा आखाडा तयार करण्यासाठी भूखंड देण्याबाबत सिडको प्रशासनाने विशेष बैठकीत तयारी दाखवली असून लवकरच याबाबतची पूतर्ता करण्यात येणार असल्याची माहिती बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी गुरूवारी सीबीडी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. सार्वजनिक उपक्रमाचे भूखंड सिकडो प्रशासनाद्वारे नवी मुंबई महापालिकडे हस्तांतरित केले जाणार असून पालिका यावर हा प्रकल्प उभा करणार आहे, या प्रकल्पांसाठी आमदार निधीतून ४ कोटी रुपयांचा निधी महापालिकेला देणार असल्याचे देखील यावेळी मंदाताई म्हात्रे यांनी नमूद केले.

पालिका क्षेत्रात सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज, बालभवन, महिला भवन, शूटिंग रेंज आणि कुस्तीचा आखाडा बनविण्याची मागणी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे. या मागण्यांसाठी मंदाताई या सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र, सार्वजनिक उपक्रमांच्या उभारणीसाठी सिडकोने पालिकेला भूखंड देणे आवश्यक आहे. त्यासाठी मंदाताई सिडको प्रशासनाकडे देखील पाठपुरावा करत आहेत. या कामांना गती देण्यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर आणि आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या उपस्थितीत ही विशेष बैठक पार पडली. या बैठकीत सिडकोने वरील पाच उपक्रमांसाठी पाच भूखंड देण्याची तयारी दर्शविली असल्याची माहिती आमदार मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी दिली. हे भूखंड पालिकेकडे हस्तांरण करण्याबाबतची कार्यवाही सिडको लवकरच सुरु करणार असून भविष्यात या प्रकल्पांवर नवी मुंबई मनपाचे नियंत्रण असणार आहे.

सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजसाठी सीबीडी येथे, बालभवन, महिला भवनसाठी नेरुळ येथे तर कुस्तीचा आखाडा बनविण्यासाठी सानपाडा येथे भूखंड देण्याची तयारी सिडकोने दाखविली आहे. शूटिंग रेंजसाठी जागा निश्चित करण्यासाठी सिडको कन्सल्टन्ट नेमणार आहे. नवी मुंबईत होऊ घातलेल्या या पाच प्रकल्पांसाठी आमदार निधीतून चार कोटी रुपयांचा निधी नवी मुंबईला देणार असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

हेही वाचा –

दिल्लीत फडणवीस-शेलार-पाटील, अमित शहांसोबत कोणती खलबत

First Published on: August 7, 2021 1:56 AM
Exit mobile version