डहाणूत अवजड वाहनांवर कारवाई; ग्रामस्थांनी पकडली वाहने

डहाणूत अवजड वाहनांवर कारवाई; ग्रामस्थांनी पकडली वाहने

अवजड वाहनांवर कारवाई

क्षमतेपेक्षा जादा मालवाहतुकीवरील कर आणि कारवाई टाळण्यासाठी दापचरी सीमा तपासणी नाका चुकवून आडमार्गाने वाहतूक करणाऱ्यांविरोधात गावकरीच आक्रमक झाले आहेत. मोडगाव येथील तरुणांनी अशी वाहने अडवून आरटीओला कारवाई करण्यास भाग पाडल्याने पोलीस आणि आरटीओच्या हप्तेखोरीला लगाम लागण्याची शक्यता आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील महाराष्ट्र सीमेवरील दापचरी सीमा तपासणी नाका चुकवून आडमार्गाने प्रवास करणाऱ्या दोन अवजड वाहनांना स्थानिकांनी अडवून त्यांना आरटीओच्या ताब्यात देत कारवाई करण्यास भाग पाडले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील धुंदलवाडी येथून मोडगाव उधवामार्गे तलासरीला निघू पाहणाऱ्या अवजड वाहनांना मोडगाव येथील स्थानिक तरुणांनी अडवून त्यांना आरटीओच्या हवाली केले. दरम्यान काही स्थानिक एजंट्सनी मध्यस्ती करत वाहने तपासणी नाक्यावर नेण्यासाठी मज्जाव करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना न जुमानता स्थानिकांनी वाहने आरटीओपर्यंत नेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई पूर्ण केली.

धुंदलवाडी मोडगाव रस्त्याची अवस्था अगदीच खराब झालेली असल्यामुळे येथील स्थानिकांना आपला जीव धोक्यात घेऊन येथून प्रवास करावा लागत आहे. त्यातच येथून रोजच शेकडो अवजड वाहने भरधाव वेगात प्रवास करत असल्यामुळे अपघातांची शक्यता वाढत आहे. त्यामुळेच अशा वाहनांबद्दल नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

क्षमतेपेक्षा जास्तीचे वजन घेऊन प्रवास करणारी ही वाहने सीमा तपासणी नाक्यावरील अतिरिक्तभाराचा कर वाचवण्यासाठी आडमार्गाचा वापर करत असून राज्य महामार्गावरून ही वाहने भरधाव वेगात मार्गक्रमण करतात. अशात रस्त्याची दुरवस्था होत असून अपघाताची शक्यतादेखील वाढत असल्यामुळे स्थानिक आक्रमक झाले आहेत. काही दिवसांपूर्वी धुंदलवाडीवरून मोडगावमार्गे अवजड वाहने मार्गक्रमण करत असताना मोडगाव येथे अवजड वाहनाच्या धक्क्याने वीजवाहक तारा तुटून पडल्या होत्या. सुदैवाने आजूबाजूच्या परिसरात नागरिकांचा वावर नसल्यामुळे कोणालाही दगाफटका झाला नाही. अनेकवेळा अपघात होत आहेत. त्यामुळे अशा प्रकारची अवजड वाहतूक बंद करावी, अशी मागणी नागरिक वेळोवेळी करत आहेत. परंतु संबंधित प्रशासनाच्या डोळ्यासमोर हा प्रकार घडत असला तरी मात्र यावर अर्थकारणाने दुर्लक्ष केले जात असल्याचे जाणकारांचे मत आहे.

हेही वाचा –

मनुकुमार श्रीवास्तव यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नेमणूक

First Published on: February 28, 2022 7:44 PM
Exit mobile version