अनधिकृत बांधकामांवर होणार धडक कारवाई

अनधिकृत बांधकामांवर होणार धडक कारवाई

वसई : वसई- विरार महापालिकेच्या विकास आराखड्यातील आरक्षित भूखंड, सरकारी आणि खासगी जागांवर होणारे अनधिकृत बांधकामांवर परिणामकारक कारवाई करण्यासाठी अनधिकृत बांधकाम नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उपायुक्त अजित मुठे या कक्षाचे प्रमुख असून नऊ प्रभागातील सहाय्यक आयुक्त, विधी सल्लागारांसह भलीमोठी टिम अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी आयुक्त अनिलकुमार पवार यांनी नियुक्त केली आहे.
वसई- विरार परिसरात अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून महापालिकेच्या विकास आराखड्यातील राखीव भूखंडांसह सरकारी आणि खासगी भूखंडांवर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे होत आहेत. प्रत्येक प्रभागातील सहाय्यक आयुक्तांवर अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पण, त्यावर परिणामकारक कारवाई होत नसल्याचे लक्षात आल्यावर आयुक्त पवार यांनी अनधिकृत बांधकाम नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. महापालिकेच्या प्रभागासह विशेष नियोजन प्राधिकरण क्षेत्रातील बेकायदा बांधकामांवर नियोजनबध्द कारवाई या कक्षामार्फत केली जाणार आहे.

उपायुक्त अजित मुठे समितीचे प्रमुख असून त्यांच्यावर अतिक्रमण निर्मूलन, निष्कासन, फेरीवाला नियंत्रणाचीही जबाबदारी देण्यात आली आहे. महापालिकेच्या नऊही प्रभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्तांच्या नियंत्रणाखाली एक टिम तयार करण्यात आलेली आहे. त्यासोबतच नगररचना विभागातील ड्राफ्ट्समन, सर्व्हअर यांनाही टिममध्ये घेण्यात आले आहे. महापालिकेच्या नगरसचिवांवर कक्षाच्या समन्वयकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.अनधिकृत बांधकामे करणार्‍यांविरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी विधी सल्लागार म्हणन प्रियांका मोरे आणि नम्रता कश्यप या वकिलांची सल्लागार म्हणून नियुक् करण्यात आली आहे. वकिलांची फौज एमआरटीपीसह बनावट कागदपत्रे तयार करणार्‍यांवर नोटीस बजावण्यासाठी मदत करतील. त्याचबरोबर कोर्टात कॅव्हेट आणि प्रतिज्ञापत्र दाखल करणे, कोर्टाचा स्थगिती आदेश उठवणे यासाठी वकिल मदत करतील.

अनधिकृत होर्डींग, बॅनरवरही कारवाई
शहरातील अनधिकृत बॅनर, होर्डींग्ज, पोस्टर्स काढून टाकण्यासाठी जाहिरात कर विभागाच्या अधिक्षक श्रध्दा मोंभारकर यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले असून यात दिपाली ठाकूर आणि अमोल भिंगार्डे यांचा समावेश आहे. हे पथक प्रत्येक प्रभागात आठवड्यातील एक दिवस अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणार आहे.

First Published on: November 30, 2022 10:08 PM
Exit mobile version