आचोळे येथील प्रस्तावित रुग्णालयासाठी आंदोलन

आचोळे येथील प्रस्तावित रुग्णालयासाठी आंदोलन

वसईः वसई-विरारकरांच्या आरोग्य सुविधांकरता वसई शिवसेना आक्रमक झाली आहे. नालासोपारा पूर्वेकडील आचोळे येथील सुसज्ज दोनशे खाटांचे रुग्णालय व वसई येथील सर डी. एम. पेटीट रुग्णालयातील प्रस्तावित जोड इमारतीचे काम तात्काळ मार्गी न लागल्यास उपोषण करण्यात येईल, असा इशारा वसई शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी दिला आहे. वसई-विरार महापालिकेच्या प्रभाग समिती ‘अंतर्गत येणार्‍या नालासोपारा-आचोळे आरक्षण क्रमांक-४५५ व सर्व्हे क्रमांक-६ येथील प्रस्तावित सुसज्ज दोनशे खाटांच्या रुग्णालयाच्या कामाचे भूमिपूजन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने सप्टेंबर २०२१ मध्ये करण्यात आलेले होते. याकामासाठी वसई-विरार महापालिकेने १५ कोटी ८२ लाख इतक्या निधीची तरतूद केलेली आहे. या रुग्णालयाच्या कामासाठी कार्यादेशही काढण्यात आलेले होते. तर वसई येथील सर डी. एम. पेटीट रुग्णालयातील जोड इमारतीचे भूमिपूजन नोव्हेंबर २०२० मध्ये तत्कालिन पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते झालेले होते. या कामासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद महापालिकेने केलेली आहे.

भूमिपूजनांनंतर या रुग्णालयांचे काम तात्काळ मार्गी लागणे अपेक्षित होते. मात्र आचोळे येथील प्रस्तावित रुग्णालय वसईच्या एव्हरशाईन आचोळे स्मशानभूमीच्या जवळ होणार असल्याने याला नागरिकांचा विरोध असल्याचे कारण वसई-विरार महापालिकेकडून देण्यात आलेले आहे. त्यामुळे निश्चित जागी हे रुग्णालय न होता थोडे पुढे बांधले जाणार आहे. त्यासाठी सुधारित आराखडा तयार करून लवकरच या कामाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती महापालिकेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांनी दिलेली आहे. तर सर डी. एम. पेटीट रुग्णालयातील जोड इमारतीचे काम ठेकेदाराने माघार घेतल्याने रखडल्याची माहितीही पालिकेतून देण्यात आलेली आहे. महापालिका देत असलेली कारणे आणि त्यामुळे रुग्णालयांचे लांबणीवर पडत असलेले काम यामुळे वसई-विरारमधील नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे. कोविड संक्रमणानंतर वसई-विरार महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेतील मर्यादा स्पष्ट झालेल्या होत्या. महापालिका स्थापनेपासूनच वसई-विरारकरांची आरोग्य सुविधांबाबत आग्रही मागणी राहिलेली आहे. त्यामुळे फुटकळ व तकलादू कारणे देत वसई-विरारकर आवश्यक सोयीसुविधा व विकासकामांत अडथळा किंवा बाधा आणतील, अशी खचितच शक्यता नाही, असे देशमुख यांनी सांगितले.

वास्तविक वसई-विरार महापालिका क्षेत्रात मागील दोन वर्षांत अनेक खासगी रुग्णालयांना प्रोत्साहन मिळत आहे. त्यांची बांधकामे पूर्णत्वास जात असताना महापालिका रुग्णालयांचे काम मात्र जाणीवपूर्वक जागेचे व अन्य कारणे देत खोळंबवून ठेवण्यात आलेले आहे. पालिकेच्या माध्यमातून देण्यात येणारी कारणे व रुग्णालयाचे लांबणीवर पडलेले काम लक्षात घेता महापालिकेच्याच हेतूवर शिवसेनेने शंका उपस्थित केलेली आहे.

First Published on: February 27, 2023 10:00 PM
Exit mobile version