नव्या ४ स्विमिंग पूलच्या कामाचे भूमिपूजन

नव्या ४ स्विमिंग पूलच्या कामाचे भूमिपूजन

भाईंदर :- मीरा -भाईंदर शहरातील विद्यार्थी, तरुण, नागरिक यांच्यासाठी शहराच्या वेगवेगळ्या भागात ४ ठिकाणी ऑलम्पिक साईज जलतरण तलाव (स्विमिंग पूल) व त्याचठिकाणी आधुनिक जिम बांधण्यात येणार आहेत. या कामाचे भूमिपूजन येत्या ४ जून रोजी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते केले जाणार आहे. मीरा- भाईंदर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या लोकसंख्येनुसार शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी आणखी चार नवे स्विमिंग पूल बांधण्यासाठी शासन निर्णय गेल्या वर्षी प्रसिद्ध झाला होता. प्रत्येकी १० कोटी असे ४ स्विमिंग पूल बांधण्यासाठी एकूण ४० कोटी रुपये निधीला मंजुरी मिळाली आहे. त्या कामाचे भूमिपूजन केले जाणार आहे. शहराच्या इतर भागात असलेली लोकसंख्या पाहता नागरिकांना त्यांच्या जवळच आपापल्या भागात सरकारचे स्विमिंग पूल उभारावेत अशी नागरिकांची मागणी होती.

त्यानुसार आमदार सरनाईक यांनी पाठपुरावा करून या कामाला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे रविवार ४ जून रोजी सायंकाळी ४ ते ७ यावेळेत चारही स्विमिंग पुलाचे भूमिपूजन नियोजित जागेत आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १४ काशीमीरा येथील महापालिकेच्या उद्यानासाठी आरक्षण क्रमांक ३६८ येथे, प्रभाग क्र. १२ मधील उद्यानाच्या आरक्षण क्रमांक २३० येथे, आरक्षण क्रमांक २४२ मध्ये या तीनही ठिकाणी ऑलम्पिक साईज तरण तलाव व आवश्यक सुविधेची इमारत बांधणे तसेच प्रभाग क्रमांक ३ मधील सचिन तेंडुलकर मैदान येथील आरक्षण क्रमांक १२२ येथे ऑलम्पिक साईज तरण तलाव व जिम बांधण्यात येणार आहे.

First Published on: May 31, 2023 10:01 PM
Exit mobile version