बोटोशी पोटनिवडणुकीतही भाजपचा पराभव

बोटोशी पोटनिवडणुकीतही भाजपचा पराभव

मोखाडा : मोखाडा तालुक्यातील काषटी सावर्डे पोटनिवडणुकीत अतिशय प्रतिष्ठेची करूनही शिवसेनेकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर आता बोटोशी ग्रामपंचायतमधील प्रभाग क्रमांक १ मध्येही भाजपला पराभव स्विकारावा लागला आहे. जिजाऊ संघटनेने भाजपला धूळ चारली आहे. तालुक्यातील काष्टी सावर्डे येथील या एका जागेसाठी भाजपने जीवाने रान केले होते. तर बोटोशी ग्रामपंचायत मधील दोन जागांपैकी प्रभाग क्रमांक एकच्या या जागेसाठी मोठ मोठ्या नेत्यांनी हजेरी लावली होती. मात्र जिजाऊ संघटनेच्या तुकाराम पवार यांनी भाजपचा पराभव केला. यावेळी जिजाऊ संघटनेच्या रुक्मिणी मालक या निवडून आल्या आहेत.यामुळे वरीष्ठ भाजपने तालुक्यात लक्ष घालून येथील पदाधिकार्‍यांची कानउघडणी करायला हवी, असे मत भाजपचे कट्टर आणि निष्ठावंत कार्यकर्ते करीत आहेत.

कारण गतसालच्या ग्रामपंचायत निवडणुकीत जवळपास १५ हून अधिक ग्रामपंचायती जिंकणार्‍या भाजपला यावर्षी मोखाडावासीयांनी पूर्णपणे नाकारले आहे. भाजपला अवघ्या ३ ते ४ ग्रामपंचायतींवरच समाधान मानावे लागले आहे.
काष्टी -सावर्डे या पोटनिवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाल्यानंतर याबाबतच्या बातम्या सर्वच वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाल्या यानंतर स्थानिक भाजपमध्ये खळबळ माजली. मात्र पराभवाची मिमांसा करायची सोडून काही पदाधिकारी पत्रकारांवर सोशल मीडियाद्वारे आगपाखड करताना दिसले. याबाबत मोखाडा पत्रकार संघाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

First Published on: May 21, 2023 9:50 PM
Exit mobile version