बोईसरमध्ये धान्याचा काळाबाजार उघडकीस

बोईसरमध्ये धान्याचा काळाबाजार उघडकीस

वाणगाव : बोईसर येथील एका रास्त भाव धान्य दुकानातील १० टन तांदूळ दोन वाहनांतून भल्या पहाटे काळ्या बाजारात विक्रीसाठी नेताना जागरूक ग्रामस्थांनी पकडून दिला आहे. तांदूळ भरलेली दोन्ही वाहने पोलिसांनी जप्त केली असून पालघर पुरवठा विभागाकडून जप्त केलेल्या धान्याचा पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सणासुदीच्या दिवसांत सामान्य नागरीकांना वाटप करण्यासाठी ठेवलेला बोईसर वंजारवाडा येथील रास्त भाव धान्य दुकानातील तांदूळ चोरीछुपे काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्याचा डाव काही जागरूक ग्रामस्थांनी हाणून पाडला आहे.सकाळी चार वाजेच्या सुमारास दोन टेंपो बोईसर वंजारवाडा रेशन दुकानाच्या जवळ संशयास्पद रीतीने उभे असल्याचे समजताच या बाबत ग्रामस्थांनी बोईसर पोलिसांना तातडीने खबर दिली.स्थानिक ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते येत असल्याची चाहूल लागल्यावर एक टेम्पो चालक टेम्पो घेऊन पळून गेला.तर दुसरा टेम्पो तांदळाच्या साठ्यासह आढळून आल्याने टेम्पो पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.

रेशनिंगच्या तांदूळ वाहतूक करणारा एक टेम्पो पळून गेल्याने टेम्पो पकडण्यासाठी पोलिसांनी चिल्हार बोईसर रस्त्यावरील बेटेगाव चौकीवर नाकाबंदी लावली होती.सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास वाहने तपासणी सुरू असताना तांदूळ वाहतूक करणारा दुसरा टेम्पोही पोलिसांनी जप्त केला आहे.धान्य भरलेले दोन्ही टेंपो बोईसर पोलीस स्टेशन येथे नेण्यात येऊन पुरवठा निरीक्षक देवेंद्र पाटील यांच्या समक्ष धान्याचा पंचनामा करण्यात आला आहे.यामध्ये दोन्ही वाहनांत प्रत्येकी ५० किलो वजनाच्या २०० गोणी असा एकूण १० टन रेशनिंगचा तांदूळ आढळून आला असून गोणींवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा शिक्का आढळून आला असून आरोपींवर अत्यावश्यक सेवा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पुरवठा निरीक्षक देवेंद्र पाटील यांनी दिली.याप्रकरणी आणखी कोण कोण सामील आहे याचा तपास बोईसर पोलीस करीत आहेत.

First Published on: August 26, 2022 9:37 PM
Exit mobile version