संजय गांधी उद्यानात बोटॉनिकल गार्डन

संजय गांधी उद्यानात बोटॉनिकल गार्डन

महाराष्ट्रातील तसेच देश विदेशातील नागरिकांना निरनिराळ्या दुर्मिळ वनस्पतींची ओळख, आवड आणि माहिती मिळण्यासाठी मराठी चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री वनराई ग्रुप आणि महाराष्ट्र वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील संजय गांधी उद्यानात महाराष्ट्रातील सर्वात मोठे बोटॉनिकल गार्डन उभारले जाणार आहे. या भव्यदिव्य गार्डनची निर्मिती करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध वृक्षमित्र प्रकाश काळे यांची निवड करण्यात आली असून येत्या दोन वर्षात 50 एकर जागेत 1 हजाराहून अधिक निरनिराळ्या प्रकारच्या वनस्पतींची लागवड केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रासह देश विदेशातील वृक्षप्रेमींसाठी एकप्रकारची पर्वणी ठरणार आहे.

वृक्षरोपणाच्या माध्यमातून राज्यतील उघड्याबोडक्या डोंगरांना हिरवा शालू नेसवणारे संवेदनशील अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री वनराई ला निरनिराळ्या दुर्मिळ वृक्षांची लागवड आणि संवर्धन करण्यासाठी वनविभागाने नुकताच मुंबईतील संजय गांधी उद्यानातील ५० एकर जागा दिली आहे.

दरम्यान, यासंदर्भात शनिवारी मुंबईत एका मिटिंगचे आयोजन सयाजी शिंदे आणि त्यांच्या ग्रुप ने केले होते. या मीटिंगमध्ये पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील सुप्रसिद्ध वृक्षमित्र प्रकाश काळे यांना विशेष रूपाने आमंत्रित करण्यात आले होते. वृक्षमित्र काळे यांना विविध प्रकारच्या दुर्मिळ आणि औषधी वनस्पतींचा ५० वर्षांचा अनुभव असून महाराष्ट्रात दुर्मिळ प्रजातींच्या वृक्षांची ओळख करण्यासाठी त्यांना बोलवले जाते. त्याअनुषंगाने सयाजी शिंदे यांच्या ग्रुपने हा प्रकल्प राबविण्यासाठी वृक्षमित्र काळे यांची निवड केली आहे. हा प्रकल्प राबवताना काळे यांच्यासोबत वन खात्याचे अधिकारी, कर्मचारी आणि सयाजी यांचा ग्रुपसोबत असणार आहे. यावेळी झालेल्या बैठकीत अभिनेते सयाजी शिंदे, डीएफओ हरिहरन आणि लिमये मुख्य वनअधिकारी, महाराष्ट्र राज्य, वृक्षमित्र प्रकाश काळे, अन्य वनाधिकारी आणि सह्याद्री वनराईचे कार्यकर्ते उपस्थित होते.

बोटॉनिकल गार्डन तयार करताना आधी सर्व जागेचा सर्व्हे केला जाईल. येथे उपलब्ध असलेल्या मूळच्या झाडांची नावे शोधून त्यावर टॅग लावून आणखी कोणकोणत्या झाडांची लागवड करायची आहे त्याची लिस्ट बनवणे. तसेच ती कुठे व कशी लागवड करायची याबाबत सर्व आखणी करून कामाला सुरुवात करण्यात येईल.
– वृक्षमित्र, प्रकाश काळे, सफाळे, जिल्हा पालघर

बोटॉनिकल गार्डन म्हणून महाराष्ट्रातील राहुरी कृषिविद्यापीठासह अकोले, दापोली आणि पुणे याठिकाणाचीच आतापर्यंत ओळख होती. तसेच याठिकाणी केवळ १०० ते १५० वनस्पती ठेवण्यात आल्या आहे. त्यामुळे संजय गांधी उद्यानातील वृक्ष लागवड आणि संवर्धनाचा प्रकल्प हा राज्यातील सर्वात मोठे बोटॉनिकल गार्डन ठरणार आहे.

वृक्षमित्र प्रकाश काळे यांना विविध प्रकारच्या दुर्मिळ आणि औषधी वनस्पतींचा गेल्या ५० वर्षांचा अनुभव असून त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रातील विविध भागात ५० हून अधिक दुर्मिळ वनस्पतींचे एझिबिशन भरवले आहे. त्यांनी वनस्पतींवर आतापर्यंत ८ पुस्तके लिहिली आहेत. वृक्षमित्र म्हणून त्यांना महाराष्ट्भर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांना विशेष पुरस्कारही देण्यात आला होता.

हेही वाचा –

खोडाळ्यात मान्सूनपूर्व कामांची लगबग; घरांची डागडुजी सुरु

First Published on: June 3, 2021 3:00 PM
Exit mobile version