कॅन्सर पिडीत व विधवा महिला मदतीपासून वंचित

कॅन्सर पिडीत व विधवा महिला मदतीपासून वंचित

भाईंदर :- मीरा -भाईंदर महापालिकेच्या २०२३ – २४ च्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी केली नसल्यामुळे शहरातील कॅन्सर पिडीत रुग्ण व विधवा महिला या महापालिकेकडून दिल्या जाणार्‍या आर्थिक मदतीपासून वंचित झाल्या आहेत. यामुळे अर्थसंकल्प लवकरात लवकर लागू करून गरीब व विधवा महिला यांना त्याचा फायदा मिळावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. कॅन्सर पीडित रुग्ण व विधवा महिलांच्या मुलगा व मुलीच्या लग्नासाठी २५ हजार रुपये महापालिकेकडून आर्थिक मदत केली जाते. महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होऊन दोन महिने झाले आहेत. अर्थसंकल्पाची अंमलबजावणी १ एप्रिल पासून लागू होणे अपेक्षित आहे. दीड महिना झाला असताना अद्यापपर्यंत अर्थसंकल्पाची अंमलबजावणी लागू केली जात नसल्याने कॅन्सर पिडीत व विधवा महिला यांना दिल्या जाणार्‍या आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागत आहे. यामुळे अनेकांची गैरसोय होताना दिसत आहे.

सदरील आर्थिक मदत मिळावी यासाठी अनेक जण पालिका दप्तरी हेलपाटे मारत आहेत. पालिका दप्तरी आल्यानंतर त्यांना योग्य उत्तरही मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. सध्या लग्न सराईचे दिवस आहेत. त्यामुळे विधवा महिलांच्या मुले – मुलीच्या लग्नासाठी मदत मिळावी यासाठी अनेक जण पालिकेत येत आहेत. लग्नाच्या वेळेस मदत मिळाली नाही तर त्याचा काय उपयोग आहे. तसेच अनेक कॅन्सर पिडीत रुग्णाचे नातेवाईक आर्थिक मदत मिळावी यासाठी पालिकेत चकरा मारत आहेत. रुग्णाला वेळेत वैद्यकीय मदत मिळणे आवश्यक आहे. परंतु वेळेवर आर्थिक मदत मिळत नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी व विधवा महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. अर्थसंकल्पाची अंमलबजावणी लवकरच केली जाणार असून कॅन्सर पीडित रुग्ण व विधवा महिला यांना लगेच आर्थिक मदत दिली जाणार असल्याचे महिला बालकल्याण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

First Published on: May 23, 2023 9:17 PM
Exit mobile version