नालासोपाऱ्यात कोम्बिंग ऑपरेशन; अनेक सराईत गुन्हेगार जेरबंद

नालासोपाऱ्यात कोम्बिंग ऑपरेशन; अनेक सराईत गुन्हेगार जेरबंद

गेल्या आठवड्यात दोन दिवसात तीन खूनाच्या घटना घडल्यानंतर नालासोपारा शहरात कोम्बिंग ऑपरेशन करून अनेक सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले. त्याचबरोबर शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्य करीत असलेल्या परदेशी नागरीकांवरही कारवाई करण्यात आली. गेल्या आठवड्यात तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या तीन घटना घडल्या. पहिल्या घटनेत सोमवारी पहाटे दोन अल्पवयीन मुलांसह तिघांनी लुटीच्या निमित्ताने एकाची हत्या केली होती. तर संध्याकाळी लुटारूने एका रिक्शाचालकाची हत्या केली होती. तर दुसऱ्या दिवशी नवऱ्याने पत्नीची हत्या केली होती. त्यानंतर वसईत खळबळ उडाली होती. या घटनेनंतर नालासोपाऱ्यात पोलीस आक्रमक झाले होते. सोमवारी पहाटे संख्येश्वर नगरात शैलेंश देवेंद्र पाठक (वय 44) याची हत्या करणाऱ्या हितेश मंगेश भोसले याच्यासह दोन अल्पवयीन मारेकऱ्यांना पोलिसांनी अटक केली. ही हत्या करण्यापूर्वी तीनही आरोपींनी पहाटेच्या सुमारास दोन जणांना चाकूचा धाक दाखवून, मारहाण करून त्यांच्याकडील मोबाईल आणि रोख रक्कम लुटली होती.

याचदिवशी संध्याकाळी नालासोपारा पूर्वेकडील गवराई पाडा शितला मंदिराजवळ प्रवाशी बनून बसलेल्या लुटारूने पैशांसाठी रिक्शाचालक किसन सच्छिदानंद शुक्ला (वय 29) याची चाकूने गळा चिरून हत्या केली होती. याही गुन्हयातील आरोपी बादलसिंग पवनसिंग ताक (वय 19, एंजनी कॉलनी, नवीन सी. जी. रोड, अहमदाबाद, गुजरात) याला गुजरातहून अटक केली. बादलसिंग हा डुक्कर पालनचा व्यवसाय करीत असून पैशांची गरज असल्याने रिक्शाचालकाला लुटण्यासाठी हत्या केल्याचे उजेडात आले आहे.

तर मंगळवारी संध्याकाळी शिर्डीनगरात राहणाऱ्या रुपेश मोरे यांने पत्नी विनिता मोरे हिची हत्या केली होती. पैशांच्या वादातून ही हत्या झाल्याचे उजेडात आल्यानंतर पोलिसांनी रुपेशला दुसऱ्याच दिवशी अटक केली. या तीन घटना घडल्यानंतर नालासोपाऱा शहरात नालासोपारा आणि तुळींज पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करून शहर पिंजून काढले होते. गुन्हेगारांवर वचक बसावी यासाठी करण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलम 188 अऩ्वये 13 गुन्हे दाखल केले. तसेच पोलीस तपासणी न करताच वास्तव्यात असलेल्या 17 नायजेरियन नागरीकांना अटक करण्यात आली. तर तुळींज पोलिसांनी केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये परकीय नागरीकांचे वास्तव्य असलेल्या वेदांत अपार्टमेंटमधील चार अनधिकृत दुकाने आणि बसेरा अपार्टमेंटमधील एक रुमवर महापालिका आणि पोलिसांच्या मदतीने तोडण्यात आली.

मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या ह्ददीतील गुन्ह्यांवर पायबंद घालण्यासाठी गुन्हे मध्यवर्ती क्राईम युनिटसह चार क्राईम युनिट आणि खंडणी विरोधी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. तर अंमली पदार्थ विरोधी पथक कार्यान्वित झाल्यानंतर गेया दोन महिन्यात सुमारे पन्नास लाखांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.

हेही वाचा –

नागपुरात ७ दिवसांचा लॉकडाऊन; नियमावली जाहीर

First Published on: March 11, 2021 3:30 PM
Exit mobile version